जीवित नदी

*जीवित नदी*

नाव ऐकलं आणि मनात आलं की काय काम आहे नक्की.. काय करतात ही झपाटलेली लोकं ? हे वेड यांना कसं झपाटून टाकतं ?
प्रवाहाविरुद्ध पोहायची कल्पना आणि ताकद येते कुठून ?

म्हणून या नदी पात्रातील फेरीत भाग घ्यायचं नक्की केलं..
ज्या नदीच्या काठावर आपलं पुणे शहर वसलं त्या नदी बद्दल आपल्याला किती माहिती आहे त्याची पण शहानिशा करायची होती..
आणि खरोखर काहीच माहिती नाही याची जाणीव फारच उदास करणारी होती..

नुसतं पुणेकर म्हणून अभिमान बाळगायचा पण प्रत्यक्षात मात्र नावा पुरतंच सगळं कौतुक !
आदिती देवधर यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या मुळा – मुठा बद्दल डोळे उघडणारी सत्य परिस्थिती मांडली तेव्हा भान आलं आणि जबाबदारीची जाणीव झाली..

आपली *मुठाई* गंगेपेक्षा प्राचीन आहे हे ऐकून अतिशय अभिमान वाटला.. खरंच.. सह्याद्री चा जन्म हिमालयाच्या आधी झाला आणि त्यामुळे ही अति प्राचीन नदी आहे.. नदीचा उगम कुठे झाला, प्रवाह कसा पुढे वाहत गेला, नदीचं पात्र केवढं होतं ,पूर रेषा म्हणजे काय , पाण्यात h2o शिवाय विरघळलेला oxygen असतो ह्या आणि अशा अनेक गोष्टी नव्याने समजल्या..

नदीचं पाणी अस्वच्छ पेक्षाही गलिच्छ आहे हे बघूनही समजतं.. त्यातील कचरा, प्लॅस्टीक, बुडबुडे , दुर्गंधी सगळंच अतिशय स्पष्ट दिसतं.. पण पाण्यावर कावळे, pond heron असे पक्षी दिसतात याचाच अर्थ असा की पाणी घाण आहे हे नव्याने समजलं..
कारण हे पक्षी कुजलेल्या पदार्थांवर जगतात..
नदीच्या पाण्यात oxygen नसून mythen आहे त्यामुळे ते पाणी अतिशय दूषित आहे.. पाण्यात मासे नाहीत.. पाणी प्रवाही नाही, जिवंत झरे अस्तित्वात नाहीत, त्यामुळे पाण्यात *जीवन* नाही.. खूप वाईट वाटलं हे ऐकून..

पेशवेकालीन इतिहास,नोंदी , पाणी पुरवठा योजना,तलाव ,आंबिल ओढा आणि नागझरी ओढा यातून जिवंत झरे असल्यामुळे होणारा अखंड पाणी पुरवठा.. भूमिगत व्यवस्था.. सचित्र बघताना लवकर समजत होतं..१९६१ च्या पानशेत पुराची पूर्ण माहिती समजली.. नदी तीरावरील अण्णासाहेब पटवर्धन यांची समाधी, त्यांचे लोकमान्यांच्या आयुष्यातील महत्व हे सर्व नवीन होते.. एका पूर्वापार खाजगी जिन्याने वर येऊन ओंकारेश्वर मंदिर बघताना पुन्हा इतिहासात डोकावून पाहिले..

ऐतिहासिक, भौगोलिक,शास्त्रीय ज्ञानाचा खजिना समोर आला होता.. नदी काठी हत्ती चे अवशेष सापडले आहेत हे ऐकून आश्चर्य चकित होण्याची वेळ आली.. आता मात्र तिथे टिटवी देखील तग धरू शकत नाही.. दोन्ही काठांवर वाढलेलं गवत आणि एरंड हे देखील पर्यावरण शास्त्रानुसार अतिशय वाईट परिस्थिती दर्शवते..

नदीची ही दुरवस्था फक्त गेल्या ४०-५० वर्षातील.. वाढत चाललेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात सुयोग्य व्यवस्थापन पुरवणं अवघड आहे त्यामुळे ७०% कचरा जरी process झाला तरी उरलेला नदीत येतो.. आणि पाणी प्रदूषित करतो..
नदीच्या या अवस्थेला जबाबदार कोण ? तर आपण नागरिक ! हे ऐकून अतिशय लाज वाटली..

आपल्या जीवनदात्रीची दुरवस्था करायला आपण जबाबदार आहोत हे ऐकून शरमेनं मान खाली गेली..
पाण्यावर येणारे बुडबुडे हे रसायनांमुळे आहेत हे समजते पण ती रसायने केवळ वाढलेली कारखानदारीतून आहे असे नाही.आपल्या घरातून आपण सर्वात जास्त रसायने पाण्यात मिसळतो.. आणि जी रसायने पाण्यात मिसळलेली असतात ती वेगळी करता येत नाही..
साबण, शांपू, डिटर्जंट पावडर, फिनेल , हार्पिक आणि टूथपेस्ट.. विश्वास बसत नाही पण ही वस्तुस्थिती आहे.. मन विचारात गढून गेले..

नदीतला कचरा, प्लॅस्टीक चा थर आणि रसायने यामुळे पाणी आणि पर्यायाने नदी *मृतवत* झाली आहे..
आपल्या फायद्यासाठी आपण नदीपात्र आकुंचित करून त्यात बांधकाम केले.. धोका तर असणारच.. आणि त्याच बरोबर काठावरची माती, गाळ पण संपला.. रुंदी बरोबरच नदीची खोली पण कमी झाली आहे..

त्यामुळे bio – degradable कचरा देखील तिथेच कुजतो, प्रवाह नाही आणि खोली पण नाही.. शुद्धीकरण करण्यासाठी पाण्यात एवढे क्लोरीन आहे की वेगळे केमिकल घालण्याची देखील गरज नाही..

यावर उपाय काय ??

याचाही उहापोह झाला, मार्गदर्शन झाले, चर्चा झाली..

काही सोपे घरगुती उपाय केल्यास आपण हे प्रदूषण रोखण्यास हातभार लावू शकतो –
१- ओला कचरा घरच्या घरी जिरवावा – त्यातही विविध प्रयोग करता येतील..

२- प्लॅस्टीक चार वापर बंद करून जवळ पिशवी बाळगावी.. गोळा केलेल्या प्लॅस्टीक ची योग्य विल्हेवाट लावावी.. यातही विविध मार्ग आहेत..

३- सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरगुती रसायनांचा कमीत कमी वापर.. आणि परत एकदा जुन्या पारंपरिक साधनांचा उपयोग.. शिकेकाई,रिठा, मीठ, गोमूत्र, विनेगर, खायचा सोडा इ.इ…

विचारात पाडणारी आणि डोळे उघडणारी अशी ही फेरी तेव्हाच सुफळ संपूर्ण होईल जेव्हा आपल्या सारखे सुशिक्षित आणि सुसंस्कृत नागरिक यात सहभाग घेतील..

५० लाख लोकसंख्येच्या प्रमाणात ५० स्वयंसेवक हे प्रमाण व्यस्त असले तरी मन:पूर्वक सहभागातून सकारात्मक बदल नक्कीच घडेल..

प्रत्येकाला पाण्यात हात घालून स्वच्छतेचे काम करणे जरी शक्य नसले तरी जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करता येतील..

शेवटी सर्व पर्यावरणवादी संघटना एकमेकांना पूरक काम करत असतात, आपणही आपला खारीचा वाटा उचलुया..

जीवित नदी साठी जीव
टाकणा-या आदिती देवधर आणि सहका-यांना खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन आणि धन्यवाद !!!

© सौ.मंजूषा थावरे
(३.१२.२०१७)

 

Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
Notify of
Close Menu
%d bloggers like this: