जयंतराव टिळक पूल आणि आजूबाजूचा परिसर

हा परिसर सुमारे ३०० वर्षांपूर्वी कसा दिसत होता, पहायचे आहे? क्षणभर डोळे बंद करा आणि हे दृष्य समोर आणा..

मुक्तपणे वाहणारी, स्वच्छ, सुंदर मुठा नदी. विस्तीर्ण पात्र. आजूबाजूला विविध पक्षी, मासे पकडणारे पक्षी, पाणवनस्पती, काठावर वृक्षवल्ली, आजूबाजूला डोळ्याला सुखावणारी हिरवाई, तुरळक वस्ती, पायवाटा, नदीकाठावर चरायला आलेली गाईगुरे... आणि एक खळाळणारा मोठा ओढा नदीला येऊन मिळतोय...

बाकी ठीक आहे पण हा ओढा कुठला आला इथे? आत्ता तर त्याचा काही मागमूसही नाही...

आत्ता ज्या ठिकाणी जयंतराव टिळक पूल आहे त्या ठिकाणी ३०० वर्षांपूर्वीपर्यंत एक ओढा वाहत होता. अंबिल ओढा. मुठा नदीला येऊन मिळणाऱ्या प्रमुख ओढ्यांपैकी (feeder streams) एक.

पण हे कसं शक्य आहे? अंबिल ओढा तर एस. एम. जोशी पुलाजवळ, वैकुंठच्या इथे मुठा नदीला मिळतो ना?

ही गोष्ट आहे अंबिल ओढ्याची... ही गोष्ट आहे त्या अंबिल ओढ्याची ज्याने पेशवेकालीन पुण्याची तहान भागवली होती, ही गोष्ट आहे ३०० वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या बदलाची…

तुम्हाला हे दृष्य डोळ्यासमोर आणायला थोडी मदत करते... आत्ताचे तुमचे ओळखीचे दृष्य तसेच ठेवून आपण हा ओढा फक्त इथे आणू...

हे दृश्य डोळ्यासमोर आणा. ही जागा ३०० वर्षांपूर्वीपर्यंत कशी असेल ह्याची कल्पना करण्याचा प्रयत्न करूयात.

अंबिल ओढा कात्रजच्या डोंगर रांगांमध्ये उगम पावतो. त्या परिसराला स्थानिक लोकं नवलाईचा दरा असे म्हणतात. तेथे नवलाई देवीचे देऊळ आहे. दोन ओढे एकत्र येऊन पुढे त्या प्रवाहाला अंबिल ओढा म्हणतात.

पूर्वी हा ओढा ऐन गावातून वाहत असे. जिलब्या मारुती, ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी पूर्वी अंबिल ओढ्याचा काठी होते. पुढे साधारण आत्ताच्या बाजीराव रस्त्याने, शनिवार वाड्याच्या शेजारून, अमृतेश्वर देवळाजवळ, आत्ता जयंतराव टिळक पूल जिथे आहे साधारण तेथे तो नदीला मिळत असे.

जयंतराव पूलाकडे तोंड करून उभे राहिले तर पुलाच्या उजव्या बाजूला उतार दिसतो, साधारण येथेच अनेक वर्ष अंबिल ओढा मुठा नदीला येऊन मिळत होता.

आत्ता केवळ सांडपाणी वाहून नेणारा नाला अश्या स्वरूपात अंबिल ओढा आपल्यासमोर येतो. आत्ताच्या अवस्थेकडे पाहून त्याच्या भूतकाळाची कल्पनाच आपण करू शकत नाही.

कात्रजच्या डोंगराच्या पायथ्याशी अंबिल ओढ्याला बांध घालून दोन तलाव करण्यात आले. पहिला तलाव भरला की पाणी दुसऱ्या तलावात जाईल अशी ती रचना होती. दुसऱ्या तलावापासून भूमिगत मार्गाने पाणी पुण्यात आणण्यात आले होते. पुण्यात ठिकठिकाणी हौद बांधून लोकांना पाणी घेता येईल अशी व्यवस्था होती.

ही व्यवस्था उभारली तेंव्हाच सारसबागेजवळ आणखी एक तलाव करून तेथून अंबिल ओढ्याचा प्रवाह वळवला व गावाबाहेरून तो मुठा नदीला मिळेल अशी व्यवस्था केली. म्हणजे आत्ता जिथे तो नदीला मिळतो, वैकुंठाजवळ तिथे.

सारसबागेत २५ एकर एवढ्या जागेत खड्डा करून तलाव निर्माण केला, त्यालाच पर्वतीचे तळे म्हणत. हिराबाग त्या तळ्याच्या काठावर होते, त्यावरून त्या तळ्याच्या व्याप्तीचा अंदाज येतो. मध्ये मोठा उंचवटा तसाच ठेवला होता, ज्यावर गणपतीचे देऊळ बांधले. तळ्यात ते बेट आणि त्यावर देऊळ, हाच तो सुप्रसिध्द तळ्यातला गणपती.

हा खूप शक्तिशाली ओढा होता. दरवर्षी पावसाळ्यात त्याला पूर यायचा. नानासाहेब पेशव्यांच्या काळात जेंव्हा पुण्याचे एका गावठाणातून शहरात रूपांतर होत होते तेंव्हा अंबिल ओढ्याला येणारे पूर त्यात अडथळा होऊ लागला. पूर्वेला नागझरी व पश्चिमेला अंबिल अश्या दोन ओढ्यांमध्ये शिवाजी महाराज्यांचे कसबे पुणे होते. आता वाढणाऱ्या पुण्याला ह्याच्या पलीकडे पसरायचे होते. त्यामुळेच बहुदा अंबिल ओढ्याचा गावातून जाणारा प्रवाह वळविण्यात आला.

सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ ह्या ठिकाणी अनेक विहिरी होत्या. एकूणच भूजलाच्या दृष्टीने समृध्द असा हा भाग आहे. ती अंबिल ओढ्याचीच देणगी आहे. अनेक ठिकाणी जेंव्हा वाडे पाडले आणि नवीन इमारतीच्या पायासाठी खोल गेले तेंव्हा अनेक दिवस तेथून पाणी वाहत होते. काही ठिकाणी त्या पेशवेकालीन व्यवस्थेचे अवशेष होते ज्यांना धक्का लागून त्यातून पाणी अखंड वाहत होते.

जिलब्या मारुती मंदिर पूर्वी अंबिल ओढ्याच्या काठी होते

जोगेश्वरी मंदिराच्या बाजूने अंबिल ओढा पुढे जायचा

आत्ताचा बाजीराव रस्ता हा साधारण अंबिल ओढ्याचा प्रवाह होता. शनिवार वाड्याच्या शेजारून तेंव्हा हा ओढा वहायचा..

अमृतेश्वर मामंदिराच्या शेजारून तो नदीकडे जायचा

Content: Aditi Deodhar

Old Ambil Odha course map: Neha Karnik

Ambil odha course recreation: Navnath Kamble