And Jeevitnadi Family Kit happened

And Jeevitnadi Family Kit happened

आपल्या घरातून नदीमध्ये अनेक घातक रसायने जात असतात, आणि एकदा ती पर्यावरणात गेली की कित्येक वर्ष ती तशीच रहणार आहेत, आणि परत परत, वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याकडे येत राहणार आहेत, अन्नातून, हवेतून, पाण्यातून..

हे दुष्ट्चक्र थाम्बविण्याचा उपाय एकच, ही घातक रसायने न वापरणे, हे आपण मागच्या ब्लॉगमध्ये पाहिले.

आम्ही सेशन्समधून हे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवत होतो.

A picture containing object, building, outdoor, wall Description automatically generated

कितीही पटले तरी हा बदल करणे सोपे नाही ह्याची आम्हालाही जाणीव होती.

घातक रसायनाना पर्याय म्हणून जे आम्ही सुचवत होतो, ते घटक पदार्थ लोक आणतील आणि घरीच उत्पादने तयार करतील ही अपेक्षा फार होती. आम्ही जीवितनदीचे कार्यकर्ते तरी कुठे सगळे लगेच अमलात आणू शकलो होतो. काही काळ हा बदल घडायला लागलाच होता.

सेशन नंतर लोक खूप गर्दी करायचे, हे पर्याय आत्ता उपलब्ध आहेत का हे विचारायचे. आमच्या लक्षात आले, सेशन नंतर हे पर्याय उपलब्ध होईपर्यंत जेवढा जास्ती वेळ जाईल तेवढे जीवनशैलीत बदल होण्याची शक्यता कमी होत जाईल. आपल्या धावपळीच्या आयुष्यात सेशनचा प्रभाव विरून जाईल आणि जैसे थे अवस्था सुरु राहील.

ह्यावर उपाय म्हणजे आपणच हे पर्याय सेशनच्या तिथे उपलब्ध करून देणे. मागच्या ब्लॉगमध्ये म्हणले तसे, आता गेल्या 2-3 वर्षात नैसर्गिक उत्पादने बनवणारे खूप उद्देजक पुढे आले आहेत. त्यावेळी फारसे पर्याय उपलब्ध नव्हते.

घातक-रसायन-विरहित जीवनशैली ही संकल्पना जर जास्तीत जास्त लोकांनी आत्मसात करायची असेल तर सध्याची उत्पादने जेवढी सहज मिळतात तेवढी सहज ही नैसर्गिक उत्पादने मिळाली पाहिजेत. असे एक “फॅमिली किट” असले पाहिजे.

उत्पादने तयार करणे आणि विकणे हे जरी आमचे साध्य नसले तरी ते साधक करणे गरजेचे होते हे लक्षात आले.

अर्थात हे लक्षात आल्यावर लगेच उत्पादन काही सुरु झाले नाही. सगळे सदस्य स्वयंसेवक, आपापला नोकरी/व्यवसाय साम्भाळून काम करणारे, त्यामुळे सगळ्याच इच्छित गोष्टी लगेच अमलात येणे शक्य नव्हते.

पण एखादी गोष्ट आपल्याला करायची इच्छा असेल तर ती नक्की प्रत्यक्षात येते. मला माहित आहे जरा जास्तीच तत्वज्ञान वाटतय. पण खरेच आमचा हा अनुभव आहे.

पुढे मुठाई नदी महोत्सव केला, तेंव्हा काही कार्यक्रम 2015 च्या महोत्सवात करायची खूप इच्छा होती पण मनुष्यबळाच्या कमतरतेने, वेळेअभावी करता आले नाहीत ते 2016 च्या उत्सवात खूप सहज आणि प्रभावी रित्या सादर झाले.

सुरुवातीला अरे, हे करायचे आहे, ते करायचे आहे, पण होत नाहीये, ह्या कल्पनेने अस्वस्थ व्हायचो. नंतर जाणवत गेले, आपण काम करत राहायचे, मदत करणारी माणसे, आवश्यक संसाधने मिळत जातात. आवश्यक तेंव्हा अगदी अनपेक्षित रित्या मार्गदर्शन, साहाय्य मिळते. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते हेही पटू लागले.

जरा विषयांतर झाले. परत फॅमिली किट कडे वळूयात..

दंतमंजन, उटने, केसांसाठी शिकेकाई-रिठा, फरशी पुसायचे द्रावण, बाथरूम-संडास साठी द्रावण, ह्या नेहमी लागणार्या गोष्टींचे नैसर्गिक पर्याय असलेला एक किट तयार करायचा आणि तो सेशन्सच्या ठिकाणी विक्रिसाठी ठेवायचा अशी योजना होती.

आणखी एक अडचण होती ती जीवितनदीच्या प्रतिमेची. आम्ही आमचा किट विकण्यासाठी उगीच रसायनांची भीती दाखवत आहोत असे तर लोकांना वाटणार नाही ना?

किटचा योग आणि आमच्या शंकेवर उपाय, दोन्ही अगदी अचानक घडून आले.

गुरुदास नुलकर, इकॉलॉजिकल सोसायटीच्या विश्वस्त आणि जीवितनदीचा हितचिंतक, आमचा मित्र, हा किट प्रत्यक्षात येण्यास कारणीभूत ठरला.

पर्यावरणदिनाच्या निमित्ताने “घातक रसायन विरहित जीवनशैली” ह्या विषयावर त्याने आमचा सेशन एका संस्थेच्या 3 शाखान्मध्ये आयोजित केला. त्याने सुचवले की ह्या सेशनच्या ठिकाणी किट विक्रीला ठेवता येईल का? तीनही शाखा धरून एकूण साधारण 1000च्या आसपास लोक सेशनला असतील. आपली संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यांना जीवनशैलीत बदल करायला मदत करण्याची चांगली संधी होती.

हे सगळे करण्यासाठी केवळ एक आठवडा हातात होता. हे कसे शक्य आहे हाच पहिला विचार आला. पण मग एकेक सदस्य जबाबदारी घेण्यासाठी पुढे आले. किट तयार करण्यासाठी कच्चा माल आणणे, घटक पदार्थ तयार करणे, पॅकिंग करणे, आणि आकर्षक किट तयार करणे ही सर्व कामे वाटून घेतल्यामुळे, धावपळ झाली तरी साध्य झाली.

अशा तर्हेने वर्षभर करू करू म्हणत होतो तो किट गुरुदास मुळे केवळ एका आठवड्यात तयार झाला.

त्या कालावधीत खूप विचारमंथन आणि चर्चा झाल्या. त्यात आमच्या द्विधा अवस्थेवरही उत्तर मिळाले. आपण किट विकत नाहीये तर एक संकल्पना विकत आहोत हा तो विचार होता. “We are not selling the product; we are selling the concept”.

किट मधले सर्व घटक जर कोणाला तयार करायचे असतील तर त्यांची कृती आमच्या संकेतस्थळावर आम्ही उपलब्ध केली. त्यात काही सिक्रेट फॉर्म्युला नव्हताच. किटचे घटक पदार्थ होते ते तर आपले पारंपरिक ज्ञानच होते.

ज्याना हे पदार्थ स्वतः करायचे आहेत त्यांच्यासाठी सर्व माहिती खुली केली आणि ज्यांना ते तयार करायला वेळ नाही, किंवा आवड नाही त्यांच्यासाठी किट विकत घेणे हा पर्याय उपलब्ध केला.

तीनही सेशन्स तर प्रभावी झालेच पण किट मुळे लोकांना लगेच, घातक रसायने टाळून, हे नैसर्गिक पर्याय अवलम्बणे शक्य झाले. ज्या लोकांनी किट त्यावेळी घेतला, त्यांचा आभिप्राय बदल, सुधारणा करण्यासाठी उपयोगी पडला. शिवाय, त्या माध्यमातून ते आमचे, पहिले ग्राहक पुढे अनेक दिवस आमच्या सम्पर्कात राहिले.

पुढे 3 वर्ष किटचे उत्पादन आणि विक्री सुरु राहिली. प्रदर्शने, eco-bazaar अशा अनेक ठिकाणी जीवितनदीचे स्टॉल्स आणि किट विक्रीला असायचे.

A group of people standing around a table Description automatically generated

सेमिनारसाठी काही संस्थानी, निमंत्रिताना भेट देण्यासाठीही किट खास ऑर्डर देऊन करून घेतले. जीवितनदीने आयोजित केलेल्या कार्यक्रमान्मध्ये पुष्पगुच्छा ऐवजी किट भेट म्हणून देण्याचा पायंडाच पडला.

A group of people sitting in front of a crowd Description automatically generated

किट तयार करणे, तो विक्रीच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवणे, मागणी-पुरवठा ह्याचे तंत्र साम्भाळणे जिकिरिचे होते. ह्या कामासाठी कोणाची पूर्णवेळ नेमणूक करायचे तर ते आर्थिक गणित त्यावेळी बसत नव्हते. आपल्या व्यावसायिक आणि कौटुम्बिक जबाबदार्या साम्भाळत ते करणे म्हणजे सदस्यांची तारेवरची कसरत होत होती.

एव्हाना नैसर्गिक उत्पादने बनवणारे अनेक उत्पादक निर्माण झाले होते. Sustainable Living Integrated Solutions ह्या उपक्रमाने ही सर्व उत्पादने एका ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्यामुळे ज्या कारणासाठी आम्ही स्वतः किट तयार करण्याचा निर्णय घेतला होता, आता त्याची गरज उरली नव्हती. शिवाय जीवितनदीच्या इतर अनेक योजना अमलात आणायच्या होत्या, जेथे सदस्यांचा हा वाचलेला वेळ वापरता येणार होता.

किटला मिळणारा प्रतिसाद चांगला होता, खूप चांगले अभिप्राय आम्हाला मिळत होते. एवढा यशस्वी उपक्रम बंद करायचा निर्णय घेणे अवघड गेले. पण किट तयार करणे हा महत्वाचा निर्णय त्यावेळची गरज म्हणून जसा घेतला, तसाच किटचे उत्पादन बंद करण्याचाही निर्णय काळाची गरज ओळखून घेतला.

प्रत्यक्ष नदीवर काम करणे गरजेचे आहेच. परंतु केवळ मूठभर (पर्यावरणवादी!) लोक नदीसाठी काहीतरी करत आहेत असे बेटासारखे अस्तित्व न राहता, जीवितनदी ही लोक-चळवळ व्हावी हे आमचे स्वप्न होते. आपल्या नदीवर प्रेम करणारा आणि प्रसंगी आपल्या नदीसाठी पाय रोवून उभा राहणारा समाज निर्माण करायचा असेल तर ह्या चळवळीला व्यापक स्वरूप येणे गरजेचे आहे. ते साकरण्यात ह्या सेशन्सचा आणि फॅमिली किटचा खूप मोठा वाटा आहे.

माझ्याकडे सत्ता नाही, पैसा नाही, मग मी नदीसाठी काय करू शकणार ह्या असाहाय्यतेला “माझ्या घरातूनच मी नदी स्वच्छ ठेवू शकतो/ शकते” हे उत्तर ह्या किटमुळे मिळाले. रोज वापरात असलेली टूथपेस्ट/ साबण ह्यात बदल करून, आपण नदी संवर्धनाच्या कामात हातभार लावू शकतो ही जाणीवच खूप आशादायी आणि बळ देणारी आहे.

  • अदिती देवधर, संस्थापक- संचालक जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाऊंडेशन

Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
Notify of