Nirmalya Management at Home
NIrmalya deposited in the river

Nirmalya Management at Home

घरच्या निर्माल्याचे व्यवस्थापन

भारतीय हिंदु संस्कृतीत दररोजच्या देवपूजेला अनन्यसधारण महत्व दिले गेले आहे. अनेक कुटुंबीयांमध्ये रोज पहाटे सूर्योदयानंतर स्नान-संध्यादि कर्मे उरकल्यावर देवघरातील देवांना शुद्ध पाणी व दुधाने स्नान घालून, ताजी फुले-पत्री अर्पण करून, उदबत्ती, धूप व तुपाच्या निरांजनाने ओवाळून आणि नैवेद्य दाखवून भक्तिभावपूर्वक यथोचित पूजा करण्याचा प्रघात कित्येक पिढ्यांपासून चालत आला आहे.

देवपूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या पूजेआधी सर्वप्रथम देवतांना वाहिलेले निर्माल्य काढून एका टोपलीत अथवा तबकात वेगळे ठेवले जायचे. मग गोळा केलेले ते निर्माल्य साधारण एक आठवडयाने गावातील नदी किंवा ओढा अशा वाहते पाणी असलेल्या पाणवठ्यात विसर्जित केले जायचे.

पूर्वी लोकसंख्या कमी होती; शिवाय हवा-पाणी-जमीन यांचे प्रदूषण नव्हते. त्यामुळे वाहत्या पाण्यात निर्माल्य विसर्जित करणे यात काहीही वावगे नव्हते.

पण काळ जसजसा पुढे जात गेला तसतसे पर्यावरणात आमूलाग्र बदल घडत गेले. लोकसंख्या इतकी वाढत गेली की त्याचा महापूर ओसंडून वाहू लागला व जगात चीनच्या खालोखाल भारताने अधिकतम लोकसंख्येचा उच्चांक कधीच गाठला. याचा दुष्परिणाम पर्यावरणावर होऊन प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली. हा प्रदूषणाचा भस्मासुर हवा, पाणी व जमीन यांवर थैमान घालू लागला.

गावांचे शहरीकरण झपाट्याने होऊ लागले. रोज नवनव्या सिमेंटच्या इमारती, कारखाने उभे राहू लागले. खेड्यांमधून माणसांचे जथेच्या जथे नोकऱ्यांच्या शोधार्थ शहरांकडे येऊ लागले. शहरांतील बकाल वस्त्यांत वाढ होऊ लागली. शहरातील पाणवठ्यांची अगदी वाट लागली. प्रत्येकाच्या घरातून येणारे रसायनमिश्रित सांडपाणी, कारखान्यांमधून बाहेर पडणारे कोणतीही प्रक्रिया न केलेले विषारी पाणी इत्यादी मिसळले गेल्यामुळे शहरांतील पाणवठे दूषित झाले. जीवनदायिनी नद्या कोरड्या पडू लागल्या किंवा त्यांमध्ये पाणी जरी असले तरी ते विषारी झाल्यामुळे प्रवाहिपणा, जीवितपणा हरवून  बसले.

खरं तर नदीमध्ये  स्वतःचे शुद्धीकरण करण्याची उपजतच क्षमता असते. परंतु प्रदूषणात झपाट्याने इतकी भरमसाठ वाढ झाली की नदीची स्वतःची शुद्धीकरण करण्याची क्षमताच आपण तिच्यापासून हिरावून घेतली. नद्यांमधील प्राणवायु (Dissolved Oxygen) कमी होत शून्यावर जाऊ लागला व नद्यांमधील जलचर, पाणवनस्पती नष्ट होऊ लागल्या. जीवनदायिनी नद्या मृतवत झाल्यामुळे त्यांचे पाणी प्रवाही म्हणजेच जिवंतपणे वाहते राहिले नाही. त्यामुळे अशा प्रदूषणयुक्त नद्या, ओढे, समुद्रामध्ये  गणेशोत्सवात हरितालिका, गणपती यांच्या मूर्ती, गौरीचे मुखवटे व निर्माल्यासारखे संबंधित साहित्य,नवरात्रातील हौसेने आरसे, मणी वगैरे अविघटनशील वस्तू वापरून सजावट केलेले मोठे घट व निर्माल्यासारखे संबंधित साहित्य तसेच दररोजच्या देवपूजेतील निर्माल्य विसर्जन करणे या चालीरीती जलप्रदूषणास पूरक व पर्यावरणाच्या आणि प्रत्येक सजीवाच्या आरोग्यास घातक ठरू लागल्या.


सध्या जलप्रदूषणाची पातळी इतकी वाढली आहे की त्याकरिता सरकार दर वेळी कोट्यावधी रुपये खर्च करत असले तरी प्रदूषणाची पातळी ‘जैसे थे’च राहात आहे. त्यामुळे सतत फक्त सरकारला दोषी ठरवून नावे ठेवत बसण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाने विवेकशीलतेने स्वतःकडे डोळसपणे पाहत आपली घातक रसायनांच्या आहारी गेलेली जीवनशैली तपासून बघावी. आत्मपरिक्षण केल्यानंतर स्वतःच्या दैनंदिन जीवनशैलीत योग्य ते बदल करत आपली जीवनशैली अधिकाधिक पर्यावरणपूरक करावी.

रोजचे निर्माल्य! किती मामुली विषय वाटतो, नाही का? पण आपल्या नदीत निर्माल्य विसर्जित करण्यासारखीदेखील सध्या परिस्थिती कशी राहिलेली नाही हे आपण बघितले. निर्माल्याबरोबर उदबत्ती-धुपाचे पुडे, प्लास्टिकच्या थैल्या इत्यादी अविघटनशील वस्तूदेखील नदीत टाकल्या जातात. नदीची सध्याची प्रदूषित स्थिती पाहता निर्माल्य व संबंधित साहित्य नदीत विसर्जित केल्याने आपल्याला कोणतेही पुण्य लाभणार नाही. याउलट आपल्या नदीला आणखी प्रदूषित केल्याचे पापच लागेल. तर मग रोजचे निर्माल्य नदी अगर तत्सम वाहत्या पाणवठ्यात विसर्जित न करता पर्यावरणास अपायकारक न ठरेल असा त्याचा आपणच थोडी कल्पनाशक्ती वापरून पुनर्वापर करूया की! हीच खरी काळाची गरज आज आपण ओळखून आणखी परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी पर्यावरण रक्षणाकरिता योग्य ती पाऊले उचलूया.

    तर दररोजच्या निर्माल्याचे काय करावे? ह्या प्रश्नाच्या उत्तरदाखल काही पुनर्वापराचे पर्याय इथे सुचवले आहेत.

बघा आपल्याला यातील कोणता पर्याय योग्य वाटतो ते! त्यानुसार लवकर अंमलबजावणी सुरू करूया.


(१) आपण निर्माल्यातील झेंडू, शेवंती, गोकर्ण, पारिजातक अशी प्रत्येक प्रकारची फुले वेगळी करून ती गरम पाण्यात घालून त्यापासून कपडे रंगवण्यासाठी, होळी व  रंगपंचमीसाठी ताजा नैसर्गिक रंग तयार करू शकतो.


(२) झेंडू, शेवंती, गुलाब पाकळ्या या घरी साबण तयार करताना साबणात घालून marigold bath soap, chrysanthemum bath soap, rose bath soap बनवू शकतो.


(३) फुले व पत्री वाळवून त्यात essential oil मिसळून त्यांची potpourri तयार करू शकतो.


(४) फुले व पत्री यांचा कंपोस्ट खत, गांडुळखत तयार करण्यासाठी उपयोग करु शकतो.


(५) झेंडूची फुले वेगळी काढून त्यातील प्रत्येक पाकळीच्या तळाशी असलेल्या बीजापासून रोप तयार करू शकतो. तसेच सुपारीच्या फुलांच्या पाकळ्या मातीत टाकून त्यांपासून रोपे तयार करू शकतो.


(६) निर्माल्यातील तुळस, बेल स्वच्छ धुवून काढ्यात/ smoothie मध्ये घालू शकतो.


(७) गोकर्णसारख्या फुलांपासून आरोग्यदायी व सुंदर रंगाचा चहा (floral tea) होऊ शकतो.


(८) पक्व झालेल्या तुळशीच्या मंजिऱ्या मातीत पेरल्यास त्यामधून यथावकाश रोपे उगवू शकतात.


(९) देशी गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद तयार करू शकतो. परंतु त्याकरिता प्रखर सूर्यप्रकाश आवश्यक आहे.
(१०) देशी गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलाबपाणी बनवू शकतो.


(११) मोगरा, गुलाब अशी आपल्या आवडीची कोणत्याही प्रकारची सुवासिक फुले गरम पाण्यात उकळून त्याचा अर्क तेलात घालून सुगंधी तेले, अत्तरे बनवू शकतो.


(१२) जास्वंदीच्या फुलांचा वापर शिकेकाईबरोबर केसांना लावण्यासाठी करू शकतो किंवा ती फुले तेलात टाकून त्या तेलाचा वापर केसांसाठी करू शकतो.

नदी व इतर नैसर्गिक जलस्रोतांचे रक्षण आणि संवर्धन करण्यात आपले पण भलेच आहे हे लक्षात घेत आजपासून आपली नैतिक जबाबदारी समजून पर्यावरण रक्षणाची सुरुवात स्वतःच्या घरापासून करूया.

लेखिका –

प्रिया फुलंब्रीकर 
जीवितनदी संस्थापक सदस्य व कार्यकर्ता,

संस्थापक – Green Bird Initiative

Green Bird Initiative Facebook page

Green Bird Initiative Youtube Channel

2
Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
newest oldest most voted
Notify of
Arun Bandi
Guest
Arun Bandi

The purpose of restricting the entry of any kind of throw away things in fresh water stream is a laudable thought for today ,owing to its contribution in fouling the river/stream water purity. ,and in India being more spiritual believing country, the psyche of throwing all offerings into river, a belief of eternal “PUNYA” is more prevailing,still now with the ignorance, “ANDHSHRADDHA” etc factors coming in it. With the awareness creating,as also a collectively participatory motive enhanced, the NGOs and such reforms thinking people coming together, is a great thing. Further, if such activity is constantly continued with dedicated volunteers… Read more »

Vivek Chhatre
Guest
Vivek Chhatre

Thanks for creating awareness on this subject! People do not know that these days it is harmful to rivers to throw nirmalya in it.