No Alternative to Homework

जीवितनदीला सुरुवात झाली आणि जाणवले आपल्याला आपल्या नदीबद्दल किती कमी माहिती आहे. किम्बहुना ज्या शहरात लहानाचे मोठे झालो त्या शहराचीही ओळख फारच वरवरची आहे.

आपण शहरात राहतो असे म्हणतो, पण रहात फक्त घरात असतो, ज्याचा काना-कोपरा आपल्याला माहित असतो. शहरात केवळ वावरत असतो. नदी तर आणखीच अनोळखी. नदीच्या जवळ जातो ते सुद्धा केवळ नदीवरचा एखादा पूल ओलांडताना.

पुण्यामध्ये मुळा-मुठा नद्या आहेत हे सगळ्याना माहित आहे. पण नक्की कुठली मुळा आणि कुठली मुठा विचारले तर किती जण सांगू शकतील?

आचार्य अत्र्यांच्या पुस्तकात पुण्याचे मुठेशी कसे काही नाते राहिले नाही असा उल्लेख आहे. “पुणेकराना नळाने पाणी मिळते म्हणून बहुदा त्यांची नदीशी जवळीक नाही” अशा आशयाचे त्यांचे वाक्य आहे. त्यांचे निरिक्षण किती योग्य होते हे आम्हाला जाणवले.

धरणे झाली, घरोघरी नळाद्वारे पाणी पोहोचले, आणि पाणी कोठून येते ह्याचा विसर पडत गेला. सुमारे 1 ते दिड लाख वर्षान्न्पासून मुठा नदीकाठी मनुष्यवस्तीचे पुरावे मिळतात. ते मानव जेवढे ह्या नदीवर अवलम्बून होते तेवढेच आपण आज आहोत. ते अवलम्बून असणे तितके आता स्पष्ट दिसत नाही एवढेच.

गोळे सरांचा 1982-83 ह्या वर्षातला मुळा-मुठा नद्यांचा अहवाल, जो आमच्या कामाचा पाया होता, तो वाचायला लागल्यावर आपल्याला आपल्या जीवनदायिनीबद्दल किती कमी माहित आहे ह्याची जाणीव होत गेली.

पुढे गटात सामील झालेला आमचा सदस्य, आदिश ह्याने नदीवर कविता केली. त्यात एक ओळ होती, “नदीला आईसारखे गृहीतच तर धरतो”. किती खरे आहे ना.

सरांचा अहवाल वाचला आणि नदीच्या प्रवासाबद्दल, तिच्या रूपाबद्दल कळू लागले. मुठा नदी कुठे उगम पावते, पुढे ती कुठल्या नदीला मिळते, नंतर कुठल्या समुद्रात ती विलिन होते, काहीच माहित नव्हते.

आता गृहपाठ हाच त्यावर उपाय होता. सरांचा अहवाल, लेख, बातम्या, ह्यातून नदीची माहिती गोळा करू लागलो.

माहिती महत्वाची आहेच, परंतु लक्षात आले की प्रत्यक्ष नदीकाठी जाऊन, हिंडूनच नदीची खरी ओळख होऊ शकते.

सुरुवातीला एक अत्यंत महत्वाकांक्षी बेत आखला. नदीच्या उगमाजवळ जायचे आणि तेथून नदीकाठाने चालत पुण्यापर्यंत यायचे. आमचा उत्साह प्रचंड होता. हे काय सहज करता येईल अशा बेफिकिरित होतो. बरेच सदस्य यायला तयार झाले. गूगल नकाशावर नदी काठाने जायचा मार्ग वगैरे आखला.

आयकॉसच्या केतकी आणि मानसीचे मार्गदर्शन घेतले, त्यांना नकाशा दाखवला आणि त्यांनी आमच्या ह्या “well planned trip” 😊 मधले धोके सांगितले.

पुणे शहरात ही भटकंती तुलनेने सोपी होती. पण नदी पुणे शहरात येण्या आधीचा भाग, काठावरची गावे, हे सगळेच अनोळखी होते. केवळ आम्ही ठरवले म्हणून नदीकाठाने चालणे शक्य होणार नाही. त्यांनी आमच्या उत्साहाला वास्तवाची जोड दिली. त्यात, आम्हा बहुतांश लोकांना उन्हातान्हात वावरायची सवय नव्हती. नदी, नदीपात्र, riparian zone ह्याचा अभ्यास करायच तर एका वेळी थोडाच प्रदेश फिरता येईल असे त्या दोघींनी सांगितले. शिवाय उगमापासून प्रवास करून शहरात नदीवर काम करताना विशेष मदत होणार नाही हे महत्वाचे त्यांच्याकडून कळले. उगमापर्यंत नक्की जाऊच पण थोडी आणखी माहिती झाल्यावर हे ठरविले.

नकाशा कसा बघायचा, रस्त्यापासून नदीपर्यंत जाण्यासाठी वाट आहे की नाही, प्रदेश कसा आहे, चालण्यायोग्य आहे की नाही हे सगळे कसे बघायचे हे त्यांनी शिकवले.

A group of people sitting at a picnic table Description automatically generated

आराखडे करताना, एक गोष्ट जाणवली, योजना, व्यवस्थापन ह्यात प्रचंड वेळ जातो. जेवढे सदस्य, तेवढी मते. भेटीचा रविवार ठरवायचा तरी प्रत्येक रविवारी प्रत्येकाला जमणार नाही हे उघड होते. प्रत्येकाला यायची इच्छा तर होती. मग ह्या रविवार ऐवजी पुढच्या रविवारी नाही का ठरवता येणार असे प्रश्न यायचे. सुरुवातीला असे बदल करत गेलो, मग लक्षात आले, अशाने continuity रहात नाही, हे करत बसलो तर सम्पूर्ण प्रदेश बघायला वेळ खूप लागेल, आणि शिवाय कुठलाही दिवस ठरला तरी कोणीतरी नाराज होणारच, ज्यांना तो सोयीचा नाही.

सगळ्यांना खूश करणे कधीच शक्य नसते, आणि तसा प्रयत्न देखील करू नये. कुठे सगळ्यांचे मत घ्यावे, कुठे त्या फंदातच पडायचे नाही, काही गोष्टी FYI ह्या सदरातच ठेवायच्या, हे जाणवत गेले. हे “ज्ञान” प्राप्त होईपर्यंत मात्र आयोजन करणार्‍या सदस्यांचे परीक्षेचे क्षण होते.

एखादा दिवस ठरवला, तर ज्यांना जमत नाही त्यांची नाराजी अटळ होती. काही सदस्य हे “personally” घ्यायचे. मला जमत नाही, मग ही तारिख ठरवली असे काहीना वाटायचे.

आपण सगळे करायचे, सगळ्यात सामील व्ह्यायचे हा आग्रह सुरुवातीला असतो. “वगळले जाण्याची” भीती सुरुवातीला खूप असते. हळूहळू गटावरचा विश्वास वाढत जातो, आणि ती भीती कमी होते.

नंतर प्रत्येक सदस्याला, आपला उपलब्ध वेळ किती आहे, आपल्याला काय आवडते, आपले कौशल्य नक्की कुठे वापरता येईल ह्याचा अंदाज येतो. शिवाय सगळ्याच प्रकल्पान्मध्ये आपण सामील व्ह्यायचे ठरवले तर कशालाच आपण न्याय देऊ शकणार नाही हेही जाणवते. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रवास होता. तेथे पोहोचेपर्यंत थोडेफार नाराजीचे क्षण आले.

नकाशावर नदीप्रदेश छोट्या तुकड्यान्मध्ये विभागला, आणि पुढचे काही आठवडे, दर रविवारी एक भाग, अशी भेट द्यायची असे ठरवले. तशी ईमेल सगळ्यांना पाठवायची, ज्यांना त्या रविवारी शक्य आहे ते येतील असे ठरवले. (ते whatsapp-पूर्व दिवस होते 😊).

टेमघर धरण परिसर, खडकवासला परिसर, विठ्ठलवाडी, म्हात्रे पूल परिसर, डेक्कन, शिवाजी पूल, डेक्कन असे विभाग केले आणि प्रत्येक रविवारी एक गट तिथे जाऊन, तो भाग जाणून घेऊन, निरिक्षणे, फोटो सगळ्यांना पाठवू लागला, त्यावर चर्चा होऊ लागली.

गटात आपोआप “collaboration” वाढले, कामाची विभागणी, delegation खूप महत्वाचे आहे हेही जाणवत गेले. सदस्यांची विविध कौशल्ये कळली. काही तर त्यांना स्वतःलाही माहित नव्हती.

अशा तर्हेने नदीची ओळख करून घेता घेता, सदस्याना एकमेकांची ओळख तर झालीच पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःची ओळख झाली.

अदिती देवधर, संस्थापक संचालक – जीवितनदी- लिव्हिंग रिव्हर फाऊंडेशन 

2
Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
newest oldest most voted
Notify of
Anonymous
Guest
Anonymous

काय योगायोग आहे पहा, गेले वर्षभर माझ्या मनात असेच विचार घोळत आहेत. मी बऱ्याच जणांसमोर हा विचार मांडतो आहे पण अजून ग्रुप जमत नाही, हे काम ग्रुप शिवाय होणे शक्य नाही. मागच्याच आठवड्यात समीर बरोबर कोंडाणे येथे जाऊन उल्हास नदीच्या उगमस्थान संबंधी माहिती घेतली. माझे एक ज्येष्ठ मित्र ज्यांनी नुकतीच नर्मदा परिक्रमा केली ते ही इच्छुक आहेत. त्यांनी अजून एक छान विचार मजजवळ बोलून दाखवला . ते म्हणाले त्यांच्या जवळ नर्मदा नदीचे उगमस्थानाचे जल आहे ते आपल्या बरोबर नेऊन आपण उल्हासनदी उगमस्थानी मिसळू जेणे करून आपले जे उद्धिष्ट आहे ते साध्य होईल, व सकारात्मक ऊर्जा सर्वत्र प्रसारित होईल. ज्या दिवशी… Read more »