Punyache Pani #5

पुण्याच पाणी (#५)

१००% धरणे भरूनही एप्रिल-मे कोरडा जाण्याची भीती गेल्या १०-१२ वर्षात वाढली आहे. यामागे काय कारण असावीत?

कमालीच्या वेगाने वाढणारी लोकसंख्या, पाणीपुरवठा व्यवस्थेतील गळतीबद्दल प्रशासन, राज्यकर्ते आणि पुणेकर नागरीक या सगळ्यांची सामूहिक उदासीनता हि कारणे आहेतच. पण अजूनही काही गंभीर समस्या आहेत. त्यासाठी थोडं आधी आपण धरणे आणि त्याची पाणलोट क्षेत्र यामध्ये जलसिंचन प्रक्रिया कशी होते ते बघू.

नदीचा उगम हा उंच पर्वत रांगांमधून होतो. आपल्या मुठा नदीचाही उगम असाच सह्याद्री पर्वत रांगेत होतो. विविध ओढे, झरे आणि प्रवाह उतारावरून वाहत पठारी प्रदेशात पोहोचतात आणि मग एक पूर मैदानांचा सुपीक सखल प्रदेश तयार करत नदी पुढे वाहत जाते. अखेर वाहून आणलेल्या गाळामधून त्रिभुज प्रदेश बनवत नदी समुद्राला मिळते. जिथे नद्या डोंगर रांगांमधून उतरून पठारी भागात पोहोचतात तो प्रदेश सामान्यतः धरण बांधायला आदर्श असा समाजला जातो. अर्थात अनेक निकषांमधील हा एक निकष आहे. धरणाच्या मागील बाजूला जे पाण्याचे साठवण क्षेत्र तयार होते त्याच्या आजूबाजूचा परिसर हे त्या धरणाचे पाणलोट क्षेत्र.

असे प्रदेश हे अत्यंत निसर्ग सुंदर असतात. म्हणुनच दर शनिवार रविवार खडकवासला,पानशेतकडची पर्यटकांची गर्दी कायम वाढतच असते! या प्रदेशात अत्यंत विरळ वस्ती असते आणि डोंगर उतारांवर नैसर्गिक जंगले टिकून असतात. या गोष्टी धरणांमध्ये पाणी साठण्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. डोंगर उतारांवरील जंगलांमुळे पावसाळ्यात जमिनीची झीज रोखली जाते. त्यामुळे धरणात वाहून येऊ शकणारा गाळ कमी होतो आणि धरणांची साठवण क्षमता टिकून राहते.

त्याचं बरोबर हि जंगले स्पंज प्रमाणे काम करत असतात. पावसाळ्याचे पाणी भूगर्भात साठवून ठेऊन नंतर वर्षभर हे पाणी झिरपत धरणामध्ये साठत राहते. यामुळे पाऊस संपल्यानंतर सुद्धा धरणात पाणी येत राहते.

पण हि जंगले नष्ट झाली तर? धरणात प्रचंड प्रमाणात गाळ साठू लागेल आणि धरणाची साठवण क्षमताच कमी होऊन जाईल. म्हणजे धरण १००% भरलेले असूनही त्यात पाणी मात्र दरवर्षी कमी कमी साठत राहणार. धरणे गाळाने भरत राहणार. तसच जंगले नष्ट झाली तर भूगर्भात झिरपणारे पाणी कमी होणार आणि पाऊस संपल्यानंतर झिरपून धरणात येणारे पाणीही कमी होणार. आणि हेच पुण्याला पाणी पुरवणाऱ्या धरणांच्या बाबतीत घडतंय!

धरणे बांधताना ज्यांच्या जमिनी आणि गावे पाण्याखाली गेली अशा प्रकल्पग्रस्तांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन न झाल्याने बऱ्याच लोकांनी परत येऊन डोंगर उतारावरील शेती सुरु केली. यामुळे जंगलांचे अच्छादन कमी होऊन जमिनीची धूप वाढली. पर्यटनामुळे या निसर्गरम्य परिसराची पुणेकरांना भुरळ पडली आणि मग फार्म हाउस, सेकंड होम वगैरे गोंडस नावे देऊन प्लॉट पाडून जमिनी विकण्याचा धंदा जोरात चालू झाला. मग जंगलं साफ होतायत, उतार सपाट करून बंगले आणि इमारती बांधल्या जातायत. या उद्योगांनी आपली धरण मात्र दिवसेदिवस कुचकामी होत चालली आहेत. त्यामुळे धरणे १००% भरली अशा बातम्यांवर समाधान मानण्याचे दिवस आता संपले आहेत.

यावर उपाय काय? तुम्ही आम्ही वैयक्तिकरित्या काय करू शकतो? Backwater, लेक view अशा गोंडस नावांखाली होणाऱ्या स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा मोह टाळणे हे सुद्धा खूप आहे. अशा ठिकाणी पैसे न गुंतवणे हीच पुढील पिढीच्या भविष्यासाठी उत्तम गुंतवणूक ठरेल! बघा पटतंय का!

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात वस्ती वाढली तर त्याचे पाण्याच्या शुद्धतेवर सुद्धा अत्यंत गंभीर परिणाम होतात. कोणते ते पुढील भागात बघू.

-मनीष घोरपडे (एक नदीप्रेमी पुणेकर)

Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
Notify of