मराठी भाषांतर: Language Service Bureau

येथे सामान्यपणे विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे आम्ही दिलेली आहेत. जर तुमच्या प्रश्नाचे उत्तर येथे नसेल तर संकोच न करता आम्हाला संपर्क करा.

——————————————————————————————————-

जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाऊंडेशन म्हणजे काय?

जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाऊंडेशन या संस्थेमध्ये पर्यावरण संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध असलेले वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसायिक लोक आहेत. आमच्या सर्व कार्याचा उददेश “नद्यांचे पुनरुज्जीवन” हेच आहे.

अशा उपक्रमाची काय गरज आहे?

जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाउंडेशनचा असा विश्वास आहे की नदी ही तिच्या काठावर राहणार्‍या मानवी समाजाचे प्रतिबिंब असते. प्रदूषित नदी आपल्या समाजाची जीवनशैली, पर्यावरण आणि भविष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन याबद्दल आपल्याला जाणीव करून देते.

नदी ही आपल्या शहरासाठी अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक संपती आहे, कारण त्यामुळेच आजपर्यंत आपल्या शहराचा विकास होऊ शकला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून नदी अगदी गटाराच्या कालव्याप्रमाणे प्रदूषित झाली आहे.

याचा परिणाम शहरातील लोकांच्या आरोग्यावर तर होतोच पण त्याचप्रमाणे, महत्त्वाचे म्हणजे भविष्यात विकासाच्या बाबतीतही गंभीर तडजोड करावी लागू शकते. म्हणून आपल्या शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचलेली ही पाऊले काळाची खरी गरज आहे,

प्रदूषण हे उद्योग धंद्यामुळे आणि अकार्यक्षम सरकार यांमुळे होते, हो की नाही?

हे आंशिक रूपात सत्य आहे. पण नदी प्रदूषित होण्यासाठी केवळ ही दोनच कारणे जबाबदार आहेत, हा खूप मोठा गैरसमज आहे. पुण्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर कोणतीही प्रकिया न करता नदीत सोडलेले सांडपाणी, घराघरातून आलेले पाणी यांचा नदी प्रदूषित होण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे.

आपण हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, नदी प्रदूषित होण्यामध्ये आपण सर्वजण समान प्रमाणात जबाबदार आहोत आणि जर आपल्याला खरच प्रदूषण कमी करायचे असेल तर आपल्याला एकत्रितपणे काम केलेच पाहिजे.

दुसर्‍याला दोष देणे हा खूप सोपा पर्याय असतो, पण त्याने आपल्याला कोणताही फायदा होणार नाही. त्यापेक्षा एकत्रित येऊन वैयक्तिक तसेच सामुदायिकरित्या आप-आपल्या जबाबदार्‍या पार पाडल्या तर ते अधिक उपयोगी ठरेल.

बऱ्याच इतर संस्था/ एनजीओ(NGO)/ आणि सहकारी संस्थासुद्धा याच गोष्टीसाठी प्रयत्न करीत आहेत.

हो, असेही खूप लोक आहेत जे या प्रश्नाबाबत संवेदनशील आहेत आणि वेगवेगळ्या तर्‍हेने वेगवेगळ्या स्वरुपात हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.

नदीचे संवर्धन करण्यासाठी झटणार्‍या सर्व गटांना एकाच ठिकाणी आणून, एक सामाजिक चळवळ घडवून आणण्याचे काम जीवितनदी करते. जे.एन (JN) चा असा विश्वास आहे की, कितीही परिश्रम केले तरी जोपर्यंत त्यात समाजाचा सहभाग नसेल तोपर्यंत कोणताही बदल शक्य होणार नाही.

साधारणपणे ४० – ५० लाख लोक प्रत्यक्षपणे नदीवर अवलंबून आहेत. यापैकी बहुसंख्यलोकांना जोपर्यंत नदी संवर्धंनाच्या गरजेची जाणीव होत नाही आणि ते या कार्यात सहभागी होत नाही तो पर्यंत नदी संवर्धनाचे काम यशस्वी होऊ शकत नाही.

आमच्या दृष्टिकोनात एक महत्त्वाचा फरक म्हणजे आम्ही प्रदूषण कमी करण्यासाठी, “उपाय-योजना“ करण्यापेक्षा त्याला कारणीभूत असणार्‍या “प्रदुषणाचे स्त्रोत” यावर अधिक भर देतो. जर बहुसंख्य लोकांनी जबाबदारीने ठराविक मार्गदर्शक गोष्टी पाळल्या, त्यांच्या जीवनशैलीत छोटे बदल केले आणि सतत त्याचा अवलंब केला, तर आमचा विश्वास आहे की मोठ्या प्रमाणावर प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. हा एक कायमस्वरूपी उपाय होऊन, भारतातील शहरांसाठी एक आदर्श बनू शकेल.

याचा अर्थ असा आहे का की तंत्रज्ञानाचा यासाठी काही उपयोग करता येणार नाही?

नाही. नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी, तंत्रज्ञानाचा वापर करून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे महत्व नक्कीच आहे. पण आपण हे समजून घेतले पाहिजे की या उपायांवरही काही मर्यादा असतात.

मैला आणि सांडपाणी प्रक्रिया क्षेत्रात मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत आढळते. याचा अर्थ असा की विद्यमान सांडपाणी प्रक्रिया प्लांटची क्षमता एकूण गरजेपेक्षा खूप (४०% अधिक मागणी आहे) कमी आहे. म्हणजे आधीच यामध्ये खूप मोठी उणीव आहे.

वाढती लोकसंख्या तसेच घातक रसायने आणि वापरून फेकून द्यायच्या वस्तू वापरण्याकडे असणारा कल इ. लक्षात घेता भविष्यात मागणी-पुरवठ्यामधील ही तफावत कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

जरी ही तफावत कमी झाली तरी हे प्लांट चालवण्यासाठी येणारा प्रचंड खर्च त्याच्या आर्थिक व्यवहार्यतेबाबत प्रश्न उभे करतो.

म्हणूनच या मर्यादा लक्षात घेता, नदी प्रदूषणाच्या प्रश्नांकडे “प्रथम प्रतिबंध” आणि मग “उपाय” या वेगळ्याच दृष्टीकोनातून डोळस नजरेने पाहणे गरजेचे आहे. चला आपण प्रदूषणाची पातळी इतकी कमी करू की ती प्रक्रिया करणार्‍या प्लांटला हाताळता येईल.

पण प्रदूषण निर्माणच होऊ नये यासाठी काय करता येईल?

प्रदूषण स्त्रोतावर उपाययोजना करून. जर आपण आपल्या दिनचर्येचे विश्लेषण केले तर आपल्या लक्षात येते की आपण अनेक रसायनयुक्त वस्तू दररोज वापरतो.

आपण वापरत असलेल्या टूथपेस्ट पासून, ते साबण, सौंदर्य प्रसाधने, कपडे धुण्याचा साबण, फरशी पुसण्यासाठी वापरात येणारी घातक रसायने इ. यातील प्रत्येक वस्तू ही असंख्य धोकादायक आणि कर्करोग होईल अशी भयानक रसायने वापरून बनविलेली असते. आणि शेवटी आपल्या दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारी ही सर्व घातक रसायने नदीत सोडली जातात ज्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही घातक रसायने केवळ नद्या प्रदूषित करीत नाही तर आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम करतात.

यातील प्रत्येक वस्तूला आरोग्यदायी आणि नैसर्गिक असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे आरोग्यदायी पर्याय केवळ आपल्या आरोग्यासाठीच नव्हे तर, नदीच्या आरोग्यासाठीही चांगले असतात. नदीमध्ये नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या रसायनांचा प्रभाव कमी करण्याची क्षमता असते. पण खनिजयुक्त आणि कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेली रसायने नदी नष्ट करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला वेगळ्या उपाययोजनेची गरज आहे.

दैनंदिन जीवनात नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक उत्पादने वापरल्यास मोठ्या प्रमाणावर प्रदूषण कमी करणे अगदी सहज शक्य आहे. याचे आरोग्याला असणारे फायदे हा अतिरिक्त लाभ मिळतो!! आणि विशेष म्हणजे, हे पर्याय अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहेत!!!

बर!!! ऐकायला छान वाटते! मग या पर्यायी वस्तू मला कुठे मिळू शकतात?

जेएन (JN) ही संस्था बाजारात उपलब्ध असणार्‍या अनेक पर्यायी सामग्रीपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यावर भर देते. तसेच ज्यांना तयार वस्तू हव्या आहेत, त्यांच्यासाठी जेएनए (JNA), तयार वस्तूचा नियमित पुरवठा विकसित करण्याच्या प्रयत्नांत आहे.

ठीक आहे. सांडपाण्याबद्दल काय?

जेएन (JN) पर्यावरण अनुकूल- स्वच्छतेच्या संकल्पनेला अधिक प्रोत्साहन देते.

सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी पर्यावरण-अनुकूल तंत्रज्ञान, पाणीमुक्त मुतारी, कोरडे शौचालय इत्यादी अनेक पर्याय आजवर प्रभावी ठरले आहेत. आमचा उद्देश आहे हे पर्याय समाजात लोकप्रिय करणे.

प्रगतीशील आणि विकेंद्रीकरण पद्धतीने उपचार केलेले सांडपाणी नदीत सोडल्यास खूप चांगला बदल घडून येऊ शकतो. योग्यरीतीने जर या उपायांची अंमलबजावणी वैयक्तिक पातळीवर घराघरात, सामाजिक पातळीवर तसेच प्रत्येक भागात झाली तर प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीपर्यंत पोहचण्याची शक्यता जवळ जवळ नाहीशीच होईल

या उपक्रमांमुळे नदी स्वच्छ आणि पूर्णपणे प्रदूषण मुक्त होईल का?

मोठ्या प्रमाणावर. पण नदी प्रदूषित होण्यासाठी अजून एक मोठे कारण म्हणजे वेगवेगळ्या शेतातून नदीत मिसळणारे प्रदूषित पाणी. या पाण्यामध्ये शेतात वापरलेल्या रासायनिक खताच्या अवशिष्टांचा समावेश असतो.

यावर कोणते उपाय आहेत?

जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाऊंडेशन हे “तुमची फळे आणी भाज्या तुम्ही स्वत: पिकवा” याला प्रोत्साहन देते. याचा अर्थ खरच सगळंच पिकवायचे असा नाही. हे शहरी भागात अशक्यच आहे. पण आपल्या अन्नातील घटक कोणत्या प्रक्रियेने तयार होतात हे आपल्याला समजले पाहिजे आणि त्याची जाणीव असायला पाहिजे.

याने आपोआपच सेंद्रिय पिकांच्या महत्त्वाबद्दल प्रत्येक व्यक्ती जागरूक होईल. अशा जागरूक असणार्‍या व्यक्ती आणि कुटुंबाकडून सेंद्रिय पिकांसाठी पुरेशी मागणी असली तर शेतकरी आपोआप सेंद्रिय शेती पद्धतीकडे वळतील आणि त्याचा त्यांना फायदाही मिळेल. आणि मग या रासायनिक खताचा वापरही आपोआप कमी होईल.

जरी ही लांब आणि दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया वाटत असली तरी, केवळ याच एका मार्गाने या प्रश्नाचे कायमस्वरूपी समाधान मिळू शकते.

वरील सर्व मार्गांचा अवलंब केल्याने आपली नदी स्वच्छ झाली, असे समजूया. पण ती परत प्रदूषित होण्याची शक्यता नेहमीच असणार आहे.

आपली चौथी महत्त्वाची संकल्पना – पर्यावरण-अनुकूल पायाभूत सुविधा इथे उपयोगी पडेल. पर्यावरण-अनुकूल पायाभूत सुविधा वरील उपक्रम वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर सुरळीत चालावे याची खात्री करतील आणि त्यात मदत करतील.

नैसर्गिक आणि जीवित नदी हवी असल्यास आणि तिचे संवर्धन करायचे असल्यास जीवित नदी पुढील चार उपाय सुचविते.

घातक रसायन-मुक्त जीवनशैली

पर्यावरण- अनुकूल स्वच्छता

तुमची फळे आणी भाज्या तुम्ही स्वत: पिकवा

पर्यावरण-अनुकूल पायाभूत सुविधा

बर!!!! हे खरच प्रेरणादायी आहे आणि आपल्या शहराच्या भविष्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे असे मला वाटते. या उपक्रमात मी कसा सहभाग घेऊ शकतो ?

सर्वप्रथम, आपण आपला मेल आय-डी आणि संपर्क क्रमांक jeevitnadi@gmail.com यावर पाठवू शकता. त्याची नोंद केली जाईल, जेणेकरून आपल्याला आमच्याकडून राबविल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती मिळेल. आम्ही आपल्याला एक मदतनीस (स्वयंसेवक) माहिती पत्रक पाठवू. आपण त्यात जी माहिती पाठवाल त्यावरून आपण कशी मदत करू शकता हे आम्हाला समजेल.

या शहरातील प्रत्येक व्यक्ती आप-आपल्या क्षमतेनुसार मदतनीस (स्वयंसेवक) होऊ शकते, असा आमचा विश्वास आहे. नदीच्या परिस्थितीबद्दल आमची तळमळ आपण समजून घ्यावी आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी शक्य त्या पद्धतीने सहकार्य करण्याची फक्त गरज आहे.