एकटे एकत्र आले ब्लॉग सिरीज

एकटे एकत्र आले ब्लॉग सिरीज

“एकटे एकत्र आले” ब्लॉग सिरीजची सुरुवात

जानेवारी 2014 ला जीवितनदीची सुरुवात झाली. ह्यावर्षी म्हणजे 2019 ला, त्या गोष्टीला 5 वर्षे पूर्ण झाली.

आमचे अनुभव सगळ्यांपर्यंत पोहोचवणे, ह्याच प्रवासाला निघालेल्या अनेक जणांना मार्गदर्शन करणे हा ह्या ब्लॉग सिरिजचा उद्देश आहे.

पुण्यात मुळा-मुठा नद्या जिवंत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. अजून ह्या ध्येया च्या जवळपासही आम्ही पोहोचलो नाही आहोत.

तुम्ही म्हणाल, मग असे असताना, आम्ही इतरांना सल्ले तरी कसे देणार? सल्ले देण्याचा हक्क अशाच लोकांना आहे ज्यांनी त्यांचे ध्येय गाठले आहे.

अगदी बरोबर आहे. पण हा प्रवास कथन करणे गरजेचे आहे. का ते सांगते.

ह्या 5 वर्षांच्या काळात आम्ही अनेक प्रयोग केले, अनेक उपक्रम सुरु केले. काही यशस्वी झाले, काही तितके यशस्वी नाहीत तर काही सपशेल फसले.

ह्या काळात, अनेक गोष्टी उमगल्या, अनेक गोष्टी ज्या अगदी सोप्या आहेत, आम्हाला पूर्णपणे समजल्या आहेत, असे वाटत होते, त्या तशा नसून चांगल्याच गुंतागुंतीच्या आहेत हे कळले.

प्रत्येक प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत, प्रश्नाचे मूळ जेथे दिसते त्यापेक्षा खूप लांब किंवा खोल आहे हे जाणवत गेले.

अनेक अडथळे आले, तसेच जेथून कधी अपेक्षा केली नव्हती तेथून आधार आणि मदत ही मिळाली. काहीवेळा तर न मागता, मदत चालत आली, मार्गदर्शन करणारे भेटले.

आपण एकटे काय करू शकणार ह्या असाहाय्य भावनेतून सगळ्यांचा प्रवास सुरु झाला होता, हळूहळू गट निर्माण झाला, वाढत गेला आणि नदी साठी काम करणारा, आपल्या नदीवर प्रेम करणारा आणि त्या नदीसाठी पाय रोवून उभा राहणारा एक समाज निर्माण होण्यास सुरुवात झाली.

“मी एकटा किंवा एकटी काय करणार” ही भावना सार्वत्रिक आहे. हतबल करणारी, हताश करणारी आहे. ज्या क्षणी ती भावना मागे पडते, त्या क्षणी एक खूप मोठे, अनेक शक्यता असलेले जग समोर येते.

आम्ही तो हताशपणा ही अनुभवला आणि एकदा तो मागे पडल्यावर काय काय करता येऊ शकते तेही अनुभवले.

एकट्याने नदीवर जाऊन काम करणे, हा विचार सुद्धा घाबरवून टाकणारा आहे, हात-पाय गाळून टाकणारा आहे. मुळा-मुठा नद्या अजून जीवित व्हायच्या आहेत, आमच्या स्वप्नातल्या मुळा-मुठा प्रत्यक्षात यायला अजून भरपूर वेळ लागणार आहे. पण “एकट्याने काम कसे करायचे” ह्या प्रश्नातून बाहेर कसे पडायचे हे आम्ही शिकलो आहे.

आणि हे इतराना नक्की शकवू शकतो, त्यांना मदत करू शकतो.

जेवढे जास्ती लोक हे शिकतील, तेवढे जास्ती नदी साठी काम करणारे योद्धे तयार होतील. आणि आपल्या देशातील सगळ्या नद्या जीवित करणे मग इतके काही अवघड काम राहणार नाही.

आणि म्हणून ठरविले, आपण जे शिकलो, ते इतराना शिकवायचे, रस्त्यातले खाचखळगे जे आम्हाला आता माहीत आहेत, त्यासाठी इतराना आधीच तयार करायचे, काही टाळता न येणाऱ्या समस्यांत, हताश न होता, मार्ग शोधायला शिकवायचे.

आणि त्यासाठीच हा लेखन प्रपंच.

केवळ नदीच नाही, तर इतर कुठल्याही प्रकल्पाला सुरुवात करताना ही माहिती उपयोगी पडेल अशी आमची खात्री आहे.

अदिती देवधर, संस्थापक संचालक, जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाऊंडेशन