“पृथ्वी आपल्याला पूर्वजांकडून वारसाहक्काने मिळत नाही, ती आपण पुढच्या पिढ्यांकडून उसनी घेत असतो”
नदी/ ओढा आपल्या गावातून वहात नाही. ते वाहतात तेथे एक गाव वसू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली. तेथे वस्ती झाली, आणि संस्कृती जन्माला आली. मानवाचे आगमन व्ह्यायच्या आधीपासून अनेक नद्या/ ओढे येथून वहात आहेत.
त्यामुळेच नदीला आपल्या संस्कृतीत आई मानले आहे. परंतु आता, औद्योगिकरण, बदलती जीवनशैली, आणि अशा अनेक कारणान्मुळे आज सर्व पाण्याचे स्रोत प्रदुषित आहेत, अतिक्रमणाने वळविले/ बुजविले जात आहेत. हे स्रोत आहेत तर आपण आहोत आणि आपल्या पुढच्या पिढ्या आहेत.
जीवितनदीने मे 2017 ला पुण्यात, “दत्तक घेऊया नदीकिनारा” हा उपक्रम सुरु केला. ह्या अंतर्गत पहिला प्रकल्प मुठा नदीकाठी विठ्ठलवाडी येथे सुरु झाला. आज, सुमारे दिड वर्षानंतर, ह्या उपक्रमात, मुठा नदीवर 4 प्रकल्प, मुळा नदीवर 1 आणि मुळा-राम नदीच्या संगमाजवळ 1, असे 6 प्रकल्प सुरु आहेत.
थोडक्यात संकल्पना अशी की आपल्या जवळचा ओढ्याचा/ नदीचा भाग आपण दत्तक घ्यायचा, तिथे नियमित काम करायचे, स्वछ्ता करायची, मूळात कचरा/ सांड्पाणी त्यात येऊच नये म्हणून उपाय करायचे, जैवविविधतेची नोंद ठेवायची आणि संवर्धनासाठी काम करायचे, गावाचे त्या पाण्याच्या स्रोताशी तुटलेले नाते परत जोडायचे.
हे सर्व, स्थानिक शाळा, विद्यार्थी, शिक्षक, नागरिक आणि स्थानिक प्रशासन ह्या सर्वानी एकत्र येऊन करायचे. कारण आपले ब्रीदवाक्य, “माझी नदी, माझी जबाबदारी”.
“माझी नदी, माझी जबाबदारी” या पुढे जाऊन आपल्या गावातले ओढे स्वच्छ करण्यासाठी ” निर्मल ओढा , निर्मल गाव ‘ ही संकल्पना व उपक्रम आता महाराष्ट्रभर राबवण्यासाठी पुणे स्थित ‘तेर पॉलीसी सेंटर’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थेच्या सहयोगातून आम्ही काम करणार आहोत . तेर पॉलीसी सेंटर ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेली सेवाभावी संस्था आहे.
ह्याची सुरुवात कशी करायची? तर हा सोपा फोर्म भरायचा. तुमची माहिती आमच्याकडे आली की आम्ही तुम्हाला सम्पर्क करू आणि प्रकल्प सुरु करायला मार्गदर्शन करू.
चला, तर मग, आपल्या नदीला/ ओढ्याला स्वच्छ, वाहते करायचे ना?
Jeevitnadi – Living River Foundation, TERRE, Ranwata