Punyache Pani #12

पुण्याचं पाणी (#१२)

जलपर्णी आणि पुण्यातील नद्या आणि तलाव यांचं एक घनिष्ट नातं गेल्या काही वर्षात पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी पुलावरून जाताना संपूर्ण नदीपात्र या जलपर्णीने भरलेलं दिसत. दुर्दैवाचा भाग हा आहे की जातयेता काहीजण हे दृश्य पाहून ‘काय छान दिसतंय न!’ असे स्वतःची सौंदर्यदृष्टी दाखवणारे रिमार्क देत असतात! काय म्हणणार यांना?

ही जलपर्णी मुळातच विदेशी वनस्पती आहे. त्यामुळे आपल्या इथंल्या परिसंस्थेत या वनस्पतीला नैसर्गिक शत्रू नाहीत जे त्याच्या वाढीवर नियंत्रण ठेऊ शकतात. त्यामुळे अनुकूल स्थिती मिळताच ही वनस्पती अतिशय वेगाने फोफावते. नदीच्या पाण्यात जर जैविक घटक अतिरिक्त प्रमाणात असतील तर ते या वनस्पतीसाठी पोषक द्रव्य ठरते.

मागील काही भागात आपण पाहिलेच आहे की प्रक्रिया न करता कोट्यवधी लिटर मैलायुक्त सांडपाणी नदीत रोज टाकले जाते. त्यातील जैविक घटकांच्या पोषणावर जलपर्णी जोमाने वाढत जाते आणि संपूर्ण पात्र पादाक्रांत करते.

याच साचलेल्या जलपर्णीवर डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होऊन किनाऱ्याजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होतो. मधल्या काळात तर पुण्याला डेंगी आणि चिकून गुनिया सारख्या आजारांची राजधानी असही बिरुद मिळालं होतं!

ही जलपर्णी काढून टाकण्यासाठी मनपा दरवर्षी करोडो रुपयांची कंत्राटे देते. अनेक स्वयंसेवी संस्था नागरिकांच्या सहभागाने त्या त्या भागातील जलपर्णी काढण्याचा कार्यक्रम राबवतात. पण हा प्रश्न दरवर्षी अधिकाधिक गंभीर होत चाललेला दिसतो.

जलपर्णी हे नदीला जडलेल्या प्रदूषणरोगाचे फक्त लक्षण आहे. मूळ रोगावर (प्रदूषणावर) उपाय केल्याशिवाय हा रोग कदापिही बरा होणार नाही. हे जर माझ्यासारख्या या क्षेत्रातील अतिसामान्य आणि अर्धवेळ अभ्यासकाला कळू शकते तर प्रशासनातील तज्ञ व्यक्तींना का कळत नाही? आणि जर कळते तर त्यावर उपायांवर अक्षम्य अशी चालढकल होताना का दिसते? सांडपाणी प्रक्रिया केंद्रे ही प्रशासनाच्या प्राधान्यक्रमात कायम शेवटच्या नंबरवर अशी कायमच परिस्थिती का? कोण बदलणार ही परिस्थिती?

प्रतिक्रिया कळवत रहा

-मनीष घोरपडे (एक नदीप्रेमी पुणेकर)

Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
Notify of