Punyache Pani #8

पुण्याच पाणी (#८)

प्रक्रियेविना मैलापाणी नदीत सोडल्यामुळे काय होत?

कोणताही जैविक टाकाऊ पदार्थ नदीमध्ये पाण्यात मिसळला कि त्याचे पाण्यामध्येच विघटन होण्याची प्रक्रिया चालू होते. यामधे पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन वापरला जातो आणि विघटीत झालेली जैविक द्रव्ये हि निसर्गामध्ये पोषक द्रव्ये म्हणून वनस्पती आणि सूक्ष्म जीवजन्तुंकडून परत वापरली जातात. अशा तऱ्हेने महत्वाच्या जैविक घटकांचा पुनर्वापर होत असतो. आणि हीच नदी परीसंस्थेमध्ये एक स्वतःची शुद्धीकरण व्यवस्था असते. परंतु हे सर्व एका मर्यादेपर्यंतच होऊ शकते. त्या मर्यादेला नदीची धारणक्षमता म्हणतात.

जेव्हा धारण क्षमतेपेक्षा खूप अधिक प्रमाणात जैविक भार नदीमध्ये मिसळतो तेव्हा काय होते?

विरघळलेला ऑक्सिजन हा विघटनासाठी पूर्णपणे वापरला गेल्याने पाण्यातील मासे आणि विरघळलेला ऑक्सिजन लागणारे इतर जीवजंतू मरून जातात. ऑक्सिजन संपूनही जैविक घटक उरल्यामुळे त्यांचे Anaerobic विघटन चालू होते. या प्रकारच्या विघटनात अमोनिया, मिथेन, हायड्रोजन सल्फाईड सारखे विषारी वायू तयार होतात, जे मानवी आरोग्याला तसेच संपूर्ण पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असतात.

एकदा का नदीतील विरघळलेला ऑक्सिजन पूर्णपणे संपून गेला कि मग नदीमध्ये कोणताही जीव जगू शकत नाही आणि मग त्या नदीला मृत नदी असेच म्हणावे लागते. आपली मुठा नदी जेव्हढी पुणे शहरातून वाहते तीसुद्धा मृत नदी आहे. बहुतांश ठिकाणी नदीमधील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण शून्य आहे. आपल्या शहराला आजही ‘जीवन’ देणारी नदी आपल्या शहरातून पुढे जाताना मात्र मृत नदी म्हणून वाहते हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीसाठी अत्यंत लाजिरवाणे आहे.

३०-४० वर्षांपूर्वीचे अहवाल असे दर्शवितात कि त्यावेळी मुठा नदीमध्ये ७० प्रकारचे मासे अस्तित्वात होते. पण आज ३-४ प्रकारचे मासेच तग धरू शकतात आणि ते सुद्धा येथील मूळ निवासी नसून प्रदूषणात तग धरू शकणार्या non-native प्रजाती आहेत. जैवविविधतेची एवढी मोठी समृद्धी आपण आपल्या नियोजनशून्य शहरीकरणाने पार धुळीला मिळवली आहे. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीतून निर्माण झालेली हि समृद्धी आपण फक्त ३०-४० वर्षात संपवली.

बऱ्याच वाचकांना हे जरा जास्त भावनिक किंवा ‘पर्यावरणवादी’ वाटेल. कारण अजून नागरिकांवर या सगळ्याचा काय परिणाम होतो याची चर्चा झाली नाहीये. पण या परिस्थितीने पुणेकरांच्या बाबतीत एक प्रचंड गंभीर आणि मोठा धोका उत्पन्न झाला आहे. त्याबद्दल सविस्तर पुढच्या भागात.

पण त्याआधी एक प्रश्न. ज्या गोष्टींमुळे वनस्पती, प्राणी, जलचर, पक्षी आणि इतर जीवजंतूंना धोका उत्पन्न होतो त्या गोष्टींच्या परिणामांपासून मानव नामानिराळा राहणे शक्य आहे का? मानवेतर सजीव सृष्टीला धोका उत्पन्न होईल या परिस्थितीला ‘विकास’ म्हणता येईल का? (जरी तो आर्थिकदृष्ट्या विकास दिसला तरीही). जैवविविधतेचा ऱ्हास हे मानवाच्या दृष्टीनेही मोठे नुकसान आहे – हे तुम्हाला पटते का? आपल्या प्रतिक्रियांबद्दल उत्सुक,

-मनीष घोरपडे (एक नदीप्रेमी पुणेकर)

Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
Notify of