खाली दिलेल्या लिंकमधून आमची पुस्तिका डाउनलोड करा,
दत्तक घेऊया नदीकिनारा
लेखक: मनीष घोरपडे
मराठी अनुवाद: Language Service Bureau
मे महिन्याच्या एका रविवारी सकाळी ७ वाजता, विठ्ठलवाडी मंदिरासमोरच्या नदी किनाऱ्यावर आमच्यातील तीन स्वंयसेवक अदिती देवधर, ओमकार गानू आणि प्रसन्न पंचवाडकर एकत्र आले आणि त्यांनी नदीचा तो भाग दत्तक घेण्याचे ठरवले. नदी किनारा स्वच्छ करणे, आणि तेथील निसर्गाचे रक्षण करणे हे या उपक्रमाचे मुख्य उददेश म्हणून ठरविण्यात आले. त्याच वेळी असे ठरवले की या उपक्रमात सामान्य लोकांना सहभागी करून घ्यायचे आणि नदी व त्यांच्यामध्ये एक नाते निर्माण करायचे. दर रविवारी, पुंडलिक मंदिराच्या अवती- भवतीच्या नदीकाठचा कचरा साफ करण्यास त्यांनी सुरुवात केली. हे पहिल्यानंतर, तेथे ये-जा करणार्या लोकांनी, सकाळी तिथे चालण्यासाठी जाणाऱ्या लोकांनी आणि इतर अनेक व्यक्तींनी एकेक-एक करत या उपक्रमात भाग घेण्यास सुरुवात केली, आणि नकळतच २५-३० जणांचा एक गट तयार झाला. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक लोक जसे, अश्विनी भिलारे, आदिश बर्वे, पूर्णिमाताई फडके, नीती दांडेकर इ. या उपक्रमात सामील झाले. मजेशीर गोष्ट म्हणजे श्री.पवार, जे पी.एम.सीमध्ये काम करतात, त्यांनीही या उपक्रमात सह्भाग घेतला. या संकल्पनेचा जन्म ती मूर्त स्वरुपात अंमलात येण्यापूर्वी अनेक दिवस ‘जीवित नदी लिव्हिंग रिव्हर फाऊंडेशन’ याच्या सदस्यांमधील चर्चेत झाला होता. ही संस्था, सन २०१४ पासून लोकांना सामील करून नदी पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्याचे काम करीत आहे. (अदिती देवधर या संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिकाही आहेत. पण जरी संकल्पना बर्याच काळापासून तयार असली तरी त्यावर प्रत्यक्ष काही कारवाई करण्यात आली नव्हती. विठ्ठलवाडी नदीकाठच्या कामाची खरी सुरुवात या तीन साथीदारांकडून झाली आणि या पुढाकारामुळेच अनेक लोक प्रेरित झाले लोक नियमित येऊ लागल्यानंतर बऱ्याच कल्पना सुचल्या आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अशाप्रकारे सगळ्याच गोष्टी सक्रिय झाल्या. त्यानंतर नदीच्या पाण्यामध्ये विरघळलेल्या ऑक्सिजनची मोजणी करण्याचे महत्त्व आणि ते प्रत्यक्ष मोजून त्याची नियमित नोंद ठेवणे इ. हे एन.जी.ओ(NGO) सागरमित्रतर्फे श्री. विनोद बोधनकर यांच्या मदतीने केले. एन.जी.ओ(NGO) पर्यावरणीय संस्था (इकोलोजिकल सोसायटी) तर्फे डॉ. स्वाती घोले यांच्या मार्गदर्शनामुळे नदीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांबाबत नवीन दृष्टिकोन कळला. कचर्याचे वर्गीकरण होऊ लागले, नैवेद्ययाचे आणि निर्माल्याचे नियोजन करण्याचे उपाय सुचविण्यात आले आणि या प्रायोगिक योजनेला सुरुवात झाली. तन्मयी शिंदे आणि तिच्या ‘स्वच्छ भारत, स्वच्छ पुणे’ मधील इतर साथीदारांनी नदीकाठच्या सांडपाणी चेंबरवर चित्रे काढली. नदीला लागून असणाऱ्या पायऱ्यांच्या बाजूला “नदीची गोष्ट’ असे नदी-संबंधित प्रदर्शन आयोजित केले गेले. नदीकाठी वैशाली कुलकर्णी यांनी लहान मुलांसाठी ‘गोष्टीचे स्थानक’ हा कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केला. त्यांच्या गोष्टींनी लहान मुले मंत्रमुग्ध तर झालीच, पण त्याचबरोबर त्यांच्या आई-वडिलांनाही निसर्गाबाबत विचार करण्यास भाग पाडले. त्या भागातील नदी संवर्धन विषयांबाबतीत मंदिरात अभूतपूर्व “किर्तन” साजरे केले गेले. (कीर्तन म्हणजे कृष्णाच्या जीवनावर आधारित भक्तीमय गाणी जी सूत्रधार गातो आणि मग त्या ओळी गटातील इतर मागून परत म्हणतात. बऱ्याचदा यामध्ये नैतिक तात्पर्य असलेले संदेश सांगितले जातात) सध्या, हे लोक दलदलीच्या भागात कृत्रिम ओलिताची जमीन तयार करायचा प्रयत्न करत आहेत जिथे सांडपाणी सोडले जाते आणि त्याचे शुद्धिकरण केले जाते. यासाठी ओईकोस तर्फे केतकी घाटे आणि मानसी करंदीकर, सेरी तर्फे सायली जोशी आणि लामनीओन ग्रीन सोल्यूशन्स तर्फे पुजा तेंडूलकर आणि प्रसन्न जोगदेव यांची खूप मदत झाली. ‘नदी किनारा दत्तक घ्या’ हा उपक्रम गेल्या १ -२ वर्षापासून चालू आहे आणि सर्वांसाठी एक उत्तम उदाहरण बनले आहे. हा उपक्रम चालू असताना आणखी दोन नदी किनाऱ्याच्या कामाची योजना चालू झाली. औंध येथील राजीव गांधी पूलाजवळील रुक्मिणी विठ्ठल मंदिराच्या पायऱ्या आणि बाणेर येथे आलोमा काऊंटि सोसायटी समोर मुळा व राम नदीचा संगम इथे ही योजना सुरू झाली आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये, औंधमधील दोन निसर्गप्रेमी, माधवी कोलते आणि वैशाली पाटकर, यांनी जीवितनदीच्या संचालक शैलेजा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हे काम चालू केले. नंतर, श्री. गणेश कलापुरे, मृणाल वैद्य, मेघना भंडारी, नेहा भडभडे आणि त्यांच्यासारखे इतर खंबीर कार्यकर्ते काही वेळेतच सहभागी झाले आणि या स्थळांना सतत भेट देणार्यांचा एक गटही तयार झाला. नदीत फेकला जाणांरा कचरा आणि मंदिरातील नैवेद्य व निर्माल्य याबद्दल जनजागृती करण्याचे काम सर्वप्रथम या गटाने केले. त्यांनी त्या क्षेत्रातील मासेमाऱ्यांसोबत एक मैत्रीचे नाते निर्माण केले आणि त्यांच्या बोटीत बसून नदीत फिरून सर्वप्रथम नदीचे खरे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रक्रिया न केलेले सांडपाणी, वाढलेल्या जलपर्णी आणि नागरिकांचे औदासीन्य इ. अडचणी सोडविण्यावर त्यांनी भर दिला. जवळचेच एक सेवा केंद्र (सर्विस स्टेशन) तेल आणि वंगण नदीत सोडत होते. त्यांनी या प्रश्नाचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला आणि शेवटी ते थांबवण्यात यशस्वी झाले. प्रत्यक्षात, टाटा मोटार या संस्थेनेही यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. नदीपात्रात पिण्याच्या पाण्याची पाईप-लाईन टाकली जात आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा या गटाने तिथे जाऊन या कामासाठी कायदेशीर परवानगी आहे याची खात्री केली. कंत्राटदारावर दबाव आणून पावसाळा सुरू होण्याअगोदर काम पूर्ण झाले आणि वेळेतच राडारोडा काढून टाकला याची खात्री करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. हे ही काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. हे काम वेळेत पूर्ण झाले नसते तर नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता मोठ्या प्रमाणत कमी झाली असती, आणि पूर येण्याची शक्यता वाढली असती. अलीकडच्या काळातच या गटाने सार्वजनिक विषयांबाबत संवेदनशील असलेल्या लोकांकडून देणगी स्वीकारली आहे व त्यातूनच मंदिरातील नैवैद्य आणि निर्माल्य यापासून सेंद्रिय (कंपोस्ट)खत तयार करण्यासाठी प्रथमच एक योजना राबवली जात आहे. यामुळे जैविक कचरा नदीत फेकणे बंद झाले आणि त्याच बरोबर त्याचे रूपांतर नैसर्गिक सेंद्रिय खतामध्ये होत आहे. औंध गावातील इतर मंदिरातही अशाच प्रकारची योजना राबविण्याचा प्रयत्न चालू आहे. या नदीकाठावर मुठाई महोत्सव, नदीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शने, गोष्टी सांगण्याचे सत्र इ. कार्यक्रम आयोजित केले गेले. यामुळे स्वयंसेवकांचा उत्साह आणि लोकांचा सहभाग वाढण्यास मदत झाली. याच वेळी अलोमा काऊंटि, बाणेर येथील शुभा आणि सागर कुलकर्णी या दांपत्याने राम आणि मुळा नदीच्या संगम क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. या नदीकाठी चालत असताना, एकीकडे जैविक विविधता आढळली आणि दुसरीकडे फेकलेल्या प्लास्टिक कचर्याबाबत काहीतरी करणे आवश्यक आहे याची जाणीव झाली. वसुंधरा अभियानातर्फे शैलेजा देशपांडे आणि अनिल मामा गायकवाड यांच्या सल्ल्यानुसार पुढील कामाला सुरुवात केली. इतर उत्साही स्वयंसेवक जसे आरती म्हसकरसुद्धा पुढे या उपक्रमात सामील झाले. पण काही दिवसातच बांधकामाचा मलमा फेकण्यास सुरुवात झाली. पूर्ण गटाने याबद्दल प्रादेशिक कार्यालय, पी.एम.सी आणि सिंचन विभागात तक्रार केली, त्याचा पाठपुरावा केला आणि पत्रकारांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे हा प्रश्न बऱ्यापैकी आटोक्यात आला. या जागेतील दोन नद्यांचा संगम आणि जैविक विविधता अधोरेखित करण्यासाठी या गटाने त्याचे अभिलेख ठेवणे सुरू केले. मोनाली शाह, धर्मराज पाटील (पक्षी तज्ञ), उषाप्रभा पागे, रेवती गुंडे, डॉ. गुरुदास नुलकर, प्रा. संजीव नलावडे, प्रा. भोगावकर, डॉ. विनया घाटे, डॉ. अनुराधा उपाध्ये (आघारकर संशोधन संस्था) आणि इतर तज्ञ व्यक्तींनी यामध्ये बरीच मदत केली आहे आणि अजूनही करत आहेत. या भागाचे अभिलेख नोंदवताना, त्यांना एक नवीन झरा आढळला. एसीडब्लूएडीएएमसंस्थेतर्फे तांत्रिक तज्ञ श्री. मनोज आणि एसओपीईसीओएम तर्फे संशोधक नेहा भडभडे यांनी झर्याची क्षमता मोजली आणि त्याची नोंद घेतली. त्यांना काही निरनिराळे प्रकारचे मासे सापडले. महासीरसंस्थेच्या श्री. राकेश पाटील यांच्या मदतीने त्यांची ओळख शोधून काढली. मुख्य म्हणजे फक्त पश्चिम घाटात विशिष्ट ठिकाणी सापडणाऱ्या काही विशिष्ट प्रजातींचा शोध लागला. गटाने लावलेल्या या शोधामुळे या भागाचे संवर्धन व संरक्षण करणे किती महत्त्वाचे आहे याची आम्हाला जाणीव झाली. या उपक्रमाबद्दल लहान मुलांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी शिबीर(कँम्प) आयोजित करण्यात आले. यामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट होत्या: झाडे आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशांची ओळख, पक्षी पाहणे आणि ओळखणे, झाडे मोजणे आणि खुणा करणे, लहान मुलांना नेहमीच हवी असणारी, वैशाली यांच्या गोष्टींचे नदीकाठी होणारे कथाकथन तसेच कौस्तुभ सावतकर यांच्या कळसूत्री बाहुल्यांचा खेळ. या आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे लहान मुले आणि त्यांचे आई- वडील यांना निसर्गाच्या जवळ आल्यासारखे वाटले. मे, २०१७ मध्ये अजून दोन नदी किनारे दत्तक घेण्यात आले. राजपुत ब्रिकक्लिन पासून एस.एम जोशी पुलापर्यंतचा नदी किनारा दत्तक घेण्यासाठी अंकुर प्रतिष्ठानतर्फे श्री. कुलदीप सावळेकर आणि सौ. मिताली सावळेकर यांनी त्यांच्या ओळखीतील ४० लोकांना एकत्र आणले आहेत. हा नदी किनारा रस्त्याच्या अगदी शेजारी आहे. सध्या, कचरा साफ करणे, झाडांभोवती कुंपण घालणे आणि त्यांची काळजी घेणे, तसेच त्या भागातील जास्तीत जास्त लोकांना या उपक्रमात सामील करून घेणे हे उपक्रम सुरू आहेत. या गटाला पाणीतज्ञ श्री. डी. बी. मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शहराच्या मधोमध असलेल्या अहिल्यादेवी मुलींची शाळाही (अहिल्यादेवीगर्ल्स हाय स्कूल) ओंकारेश्वर मंदिराभोवतीचा नदी किनारा दत्तक घेण्यास पुढे सरसावली आहे आणि शाळेतील विद्यार्थिनी आठवड्यातून एकदा नदी किनारा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे या उपक्रमाबद्दल जनजागृती करण्याचे कामही त्या करत आहेत. या विद्यार्थीनींच्या शिक्षिका शुभदा राजगुरू आणि मुख्याध्यापिका सुलभा शिंदे यांनी उपक्रमात पुढाकार घेतला आहे. सिम्बायोसिस – आंतरराष्ट्रीय व्यापार संस्था (सिम्बायोसिस इन्स्टिटूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस) हिंजवडी भागातील नदी किनारा दत्तक घेण्यासाठी इच्छुक आहे. अल्पकाळातच, म्हणजे अगदी एका वर्षात पाच नदी किनारे दत्तक घेण्यात आले असून या उपक्रमात लोकांचा सहभागही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सहभागी झालेले स्वयंसेवकही त्यांच्या भागात असलेल्या नदीचे पर्यावरण समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. नदीसंबंधी असलेल्या निरनिराळ्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधण्यासाठी नागरिक एकत्र येत आहे. ते सरकारवर एक सकारात्मक दबाव आणत आहेत. गेल्या वर्षभरातच, या उपक्रमाचे रूपांतर एका चळवळीत झाले आहे. म्हणूनच मुळा आणि मुठा नदी पुनरुज्जीवित होण्याची आशा आता वाढू लागली आहे. जर मोठ्या प्रमाणावर लोकांनी त्यांचा नदीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर ह्या नद्या स्वच्छ, पवित्र, सुंदर, पूर्ववत होतील आणि पुन्हा नैसर्गिक स्थितीत येतील . तुमच्या केवळ सक्रिय सहभागाची गरज आहे.
Great content! Super high-quality! Keep it up! 🙂