पुण्याचं पाणी (#१३)
गेल्या काही भागांमध्ये मैलायुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडल्याने काय काय परिणाम होतात याची चर्चा केली. याची थोडी उजळणी करणे आवश्यक आहे –
- मैलायुक्त सांडपाणी नदीत सोडल्याने नदीच्या पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन विघटनासाठी वापरला जातो आणि संपून जातो. यामुळे नदीतील मासे आणि इतर जीव ऑक्सिजन न मिळाल्याने मरून जातात, तसेच त्याची पुढे वाढ होऊ शकत नाही.
- ऑक्सिजन संपल्यावर Anaerobic विघटन चालू होते, ज्यातून मिथेन / हायड्रोजन सल्फाईड सारखे मानवी आरोग्याला आणि पर्यावरणाला घातक वायू तयार होतात.
- हेच प्रदूषित पाणी पुढील गावांमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करते. तसेच पशुधनावर या पाण्याचा गंभीर परिणाम होऊन स्थानिक शेती आणि दुग्धव्यवसाय संकटात आल्याने आर्थिक परिणामही या गावकर्यांना त्यांचा कोणताही दोष नसताना पुणेकरांमुळे भोगायला लागतात.
- या प्रदूषित पाण्यामध्ये जलपर्णी वेगाने फोफावल्याने शहरासाठी अजून एक मोठी समस्या निर्माण होते. डासांचा प्रादुर्भाव जलपर्णीच्या बरोबरीनेच वाढून सार्वजनिक आरोग्याचे तीनतेरा वाजतात. तसेच हि जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च होत्तात.
- वर्षानुवर्षे प्रक्रियेशिवाय सोडल्या गेलेल्या सांडपाण्यामुळे अत्यंत घातक असे जीवाणू / विषाणू आता नदीच्या पाण्यात निर्माण झाले आहेत, जे सध्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही औषधांना दाद देत नाहीत. यामुळे पुणेकर आज एका टाइम बॉम्बच्या सान्निध्यात राहतायत असे म्हणले तर वावगे ठरू नये.
या सगळ्यावर एक कडी ठरू शकेल अशी गोष्ट गेल्या काही दिवसातच प्रकाशात आली आहे. प्रक्रिया न करता सांडपाणी नद्यांमध्ये सोडत असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुणे महापालिकेला दंड ठोठावला आहे. किती? दररोज ३४ लाख रुपये इतका जबर दंड आहे हा. आणि १५ कोट रुपयांची वसुलीही केली आहे.
हा विषय खर तर एव्हढा मोठा आणि अतिमहत्त्वाचा आहे कि पुण्यातील सर्व पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणार्या व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्था यांनी या गोष्टीवर एकत्र येऊन मोठे जन आंदोलन केले पाहिजे. परंतु ‘स्वतंत्र बाणा’ हा खास पुणेरी गुण बहुधा इथे आडवा येतो आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या समस्यांवर काम करत राहतात. असो.
याबद्दलची एक online याचिका मी दीड वर्षापूर्वी change.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून तयार केली आहे. याला आजवर जवळपास ५००० नागरिकांनी पाठींबा नोंदवला आहे. हि याचिका पुण्याचे धोरणकर्ते आणि निर्णयकर्ते मा. महापौर मुक्ता टिळक आणि मा. आयुक्त सौरभ राव यांना उद्देशून आहे.
http://chng.it/Zm2Pj4Yg या लिंकवर जाऊन हि याचिका तुम्ही बघू शकता. आणि त्यातील मागण्या तुम्हाला पटल्यास जरूर sign करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी हातभार लावा. जेव्हढे जास्त नागरिक या गोष्टींचा आग्रह धरतील तेव्हढेच प्रशासन गतिमान होण्याची शक्यता जास्त होत जाईल आणि या विषयाकडे अधिक गांभीर्याने बघू लागेल.
सांडपाणी हि जाशी गंभीर समस्या आहे तशीच नद्यांच्या किनारी आणि नद्यांमध्ये टाकला जाणारा घन कचरा हि सुद्धा एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. सांडपाण्याच्या समस्येची सोडवणूक बरीचशी शासन आणि प्रशासनाच्या निर्णय आणि अंमलबजावणीवर अवलंबून आहे. पण घन कचरा हि समस्या मात्र नागरिकांची जबाबदारी आहे. पुढील काही भाग आपण घनकचरा समस्या आणि त्यामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण यावर चर्चा करू.
-मनीष घोरपडे (एक नदीप्रेमी पुणेकर)
Leave a Reply