Guest Blog – Patal-Bhootal-Vyom
R. Meena -ghats

Guest Blog – Patal-Bhootal-Vyom

It is easy to get discouraged by the magnitude of problem, river pollution, encroachment, sewage discharged in the rivers, apathy towards our rivers. What can anybody find a solution? and how? Key is focusing on "What I can do for my river" and start the work. Once you start, you will start attracting like-minded people, related posts and articles. And pretty soon, your lone efforts will be strengthened by the community of like-minded river warriors. In this wonderful guest blog by Dr. Swati Dixit, she discusses Meena river she grew by, states of our rivers and solutions she implemented to bring about a change.

पाताल- भूतल-व्योम

“So, my dear students….on this note, will stop here, hope you have understood  the concept .. ‘river  system”….

“नदीप्रणाली” .. उगम ते मुख याबद्दलची ‘शुद्ध भौगोलिक’ चर्चा करून समाधानाने  वर्गाबाहेर पडणे हे मी गेले कित्येक वर्षे

  करत होतेच , मीच काय माझे शाळेतले आणि अगदी विद्यापीठातील शिक्षकही याला अपवाद नव्हते.

 प्रत्येक विषयाने  आपापल्या सीमारेषा अगदी काटेकोरपणे आखलेल्या! इतर विषयांची  लुडबुड त्यात नाहीच.

 नदीचा धडा म्हणजे उगम, टप्पे, खनन, वहन, भरण क्रिया, आणि भुरूपे!

 ‘नदीचे महत्त्व सांगा’ ??  या प्रश्नावर, तयार असते तिच्यापासून, फक्त आणि फक्त माणसालाच मिळवायच्या फायदयांची

 यादी! 

 आणि ‘multidisciplinary approach’???  “ हे काय असतं रे भाऊ?”

 ‘अहो अस कसं ? प्रत्येक विषयाची जी philosophy….अर्थात तत्वज्ञान असतं ना त्यात आवर्जून असतं बर का हे प्रकरण!’

            

      थोडक्यात काय, तर मी आहे ‘‘भूगोळ आहे भूमंडळी’ या समर्थ रामदासांच्या उक्तीला आणि विश्वाच्या प्राचीनतेला  प्रमाण मानून प्रामाणिकपणे अध्यापन करणारी,  शहरातली , भूगोल विषयाची प्राध्यापिका. पूर्वी,  जिवंत, रसरशीत खराखुरा

भूगोल मी माझ्या नारायणगाव या त्यावेळच्या छोट्याश्या टुमदार खेड्यात अक्षरशः जगत होते.

Meena river origin near Junnar

दोन वेशींमधले सडा रांगोळ्यानी सजलेल्या रस्त्याभोवतली वसलेले, सह्याद्रीच्या लेकींच्या म्हणजे छोट्या टेकड्यांच्या कुशीतले, गच्च- दाट हिरवाईच्या किनाऱ्यांमधील, मीना नदीची आरसपानी झुळझुळ अनुभवणारे माझं गाव हाच भूगोलातला महत्वाचा अध्याय होता हे शाळेतल्या अभ्यासातून कधी समजलेच नव्हते, अर्थात ही माझी मर्यादा असेल. आजही  विद्यार्थ्यांना, प्रत्येक विषय शिकताना औपचारिक शिक्षण आणि जीवन याचा सहसंबंध किती असतो आणि समजतो याची शंकाच आहे. 

माझ्या गावात  व्रत-वैकल्यातून , लोककथातून, प्रथांतून, संकेतांतून निसर्ग जपला जायचा. पिंपळावरच्या मुंजाच्या भितीने आणि राखणदार खंडोबाच्या गोष्टींनी किती झाडे वाचली, अपार श्रद्धेमुळे देवराया- त्यातले वनचर निर्धास्त  झाले, अंधार पडल्यावर येणाऱ्या भुतांनी लेंडी ओढ्यावर पाणी प्यायला येणाऱ्या प्राण्यांना माणसांपासून अभय दिले. उन्हाळ्यात आटलेल्या नदीची , हाताने थोडी वाळू बाजूला करताच ,थंडगार झिऱ्याचे पाणी आणि बांधावरची झाडे तन – मन तृप्त करायची. उकिरडे होते, प्रदूषण नव्हते. संसाधने आणि गरजा दोन्हीही अगदीच कमी. भूगोल- निसर्ग आधी मला प्रत्यक्ष भेटला आणि पुस्तकात मागाहून !

R. Meena-broad channel with green islands

     शहरी जीवन स्वीकारल्यावर होणारी  दमछाक आपल्याला सुखासीनतेच्या शोधात कृत्रिमतेकडे नेते. शहराशी  जुळवून घेताना lifestyle कधी -कशी बदलत गेली  ते समजलेच नाही. कपाटातले चार सहा कपडे-जोड ठेवायचे कपाट जाऊन वॉर्ड रोब भरला, जाहिरातींच्या माऱ्याने कधी न वापरलेली cosmatics जीवनावश्यक गरज बनली, कोणतीही गोष्ट किती जास्त काळ वापरता येईल या विचारावर ‘use & through’ ने ‘सोयिस्कर’ मात केली. शिकेकाई च्या जागी सुगंधी फेसाळ शाम्पू तर old fashioned ५०१ सारखा साबण ‘कपडोंकी चमकार’ च्या तेजाने अंधारात फेकला गेला , दातून , राखुंडी , दंतमंजन सारखे गावठी प्रकार सोडून ,पेस्ट- ब्रश ने आंम्ही आधुनिक झालो…. एकविसाव्या शतकाकडे ‘प्रगतीसाठी’ झेपावलो .

 शहरीकरणाचा चुंबक खेड्यातल्या  माणसांनाच  आपल्याकडे खेचत नाही तर पैशांची दौलतजादा निसर्ग- पर्यावरण समतोल हिरावून घेते. पुण्यात आल्यावर, स्थिरावल्यावर आणि मुख्य म्हणजे शिक्षक म्हणून काम करताना याची प्रकर्षाने जाणीव अस्वस्थ करू लागली . lithosphere, atmosphere, hydrosphere, इको-सिस्टिम्स याची चर्चा, लठ्ठ मुठ्ठ पुस्तकातल्या  गुळगुळीत पानांतील ज्ञान विवेचन, आणि आजूबाजूचे  उध्वस्त होत जाणारे पर्यावरण यांचा ताळमेळच लागेना. नदीप्रणाली, जलचक्र, याबद्दल वर्गात कळकळीने शिकवले, छान व्हिडिओज दाखवले तरी  पुलावरून जाताना छिन्न-विच्छिन्न मुठा नदी आणि गावाला गेलं की लोकांनी वाळीत टाकलेली मीना नदी  जाब विचारायची…. अजूनही नद्याच काय पण सुकलेला ओहोळ पण जाब विचारतो. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सगळ्यांकडे आहेत, पण प्रश्न हा आहे की बहुतेक सगळ्यांना प्रश्नच कळले  नाहीत  म्हणून कोणा एकाकडे उत्तरेच नाहीत.

R. Meena-green banks replaced by buildings

No-longer-green-banks of Meena river

seewage in the river meena

Untreated sewage, directly being discharged in Meena river

अर्थात विषयाची गरज म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था, व्यक्तींचे मार्गदर्शन आणि त्यांच्या कामात छोटासा सहभाग लाभला आणि पर्यावरणीय समस्या किती गुंतागुंतीची आहे हे लक्षात आले. ग्लोबल वॉर्मिंग वर कितीही काही करावेसे वाटले तरी मी एक व्यक्ती म्हणून जादूच्या काडीने नाही  ना काही करू शकत!  आज प्रत्येक व्यक्तीला पर्यावरणासाठी काहीतरी करावेसे वाटते, तसेच मलाही वाटते. माझ्यासारखी सामान्य व्यक्ती घर-दार, संसार, नोकरी  सांभाळून पर्यावरणासाठी नक्की काय योगदान देऊ शकते ?

      असे वाटत असतानाच आदरणीय गोळे सरांनी स्थापन केलेल्या इकॉलॉजिकल सोसायटीने नव्याने सुरु केलेल्या एक वर्षाच्या sustainable management कोर्स मध्ये प्रवेश घेतला. तिथल्या महाजन सरांनी सांगितलेल्या जाबालाच्या गोष्टीत रंगून गेल्यावर एकच ब्रह्मवाक्य मनावर ठसले ‘पर्यावरणाचे ज्ञान हेच ब्रह्मज्ञान होय’. गोळे सरानी ‘environmental restoration’ ची गरज अधोरेखित केली. स्वाती मॅडमच्या वर्गामधून विविध भुरूपे, नदीप्रणाली आणि त्यांची पर्यावरणीय सेवा किंवा कार्ये हे नव्यानेच  उलगडत गेले. त्यातून  एक जाणीव झाली की ‘विद्यार्थ्यांना केवळ  नैसर्गिक घटक तयार होण्याची प्रक्रिया आणि वितरण (formation process & distribution) आणि अर्थातच त्याचे आर्थिक फायदे या पलीकडे जाऊन त्यांची  पर्यावरणिय कार्ये (ecological services ) समजावून सांगण्याची आणि इको-सिस्टिम्स च्या पुनरुज्जीवनाची  आज नितांत  गरज आहे.

‘एक शिक्षक म्हणून ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ …. आपण काय महान कार्य करताय पर्यावरणासाठी’ ?…. मीच मला प्रश्न विचारू लागले.  

‘हो, reuse, reduce, refuse वगैरे थोडेफार करते, जमेल तसं.’ माझं गुळमुळीत उत्तर.

बरेचदा असच होत की पर्यावरणाचा विध्वंस आणि त्याची व्याप्ती डोळ्यासमोर दिसते मात्र त्यात आपण काय- किती करायचं, आपण एकटे काय करणार  याबद्दल मनात खूप गोंधळ असतो. ‘अर्थात मूळ पुणेरी  लोकांना असा अजिबात प्रश्न पडत नाही, कारण त्यांना सगळ्यातले सगळेच माहित असते’ असं माझी पुण्याबाहेरची मैत्रीण म्हणते. 

     तर जलबिरादारी, सागरमाथा, जीविधा, ऑइकॉस, वसुंधरा, जिवीतनदी अश्या संस्थांशी नाते होतेच. प्रत्येक गृहिणी करते तसा निगुतीने संसार करत पाणी, विजेची बचत वगैरे फंडे वापरत होते. पोरांवर ‘ए s s नळ हळू सोड रे’ असे ओरडून पर्यावरणाचे महान कार्य केल्याच्या अविर्भावात वावरत होते.

 पर्यावरणीय प्रश्नांचे अनेक पैलू-प्रश्न अनेकांकडून समजून घेतले ना तरी त्याचे आपण आपल्यापरीने, आपल्यासाठीची उत्तराची रेसिपी आपणच तयार करायची असते. ग्लोबल वॉर्मिंग मुळे मोठ्या प्रमाणात झालेली ध्रुवीय प्रदेशाची आणि पर्यायाने पृथ्वीची झालेली वाताहत पाहून काही क्षण रक्त जरूर उसळते पण शेवटी ऍक्शन मात्र वैयक्तिक पातळीवरच  घ्यायची असते. 

जिवीतनदीच्या तीन दिवसांच्या कार्यशाळेने  मात्र एक साक्षात्कार झाला की मी माझ्या कृतीतून पर्यावरणीय प्रश्नांना सामोरी जाऊ शकते, ‘घरातून सुद्धा माझ्या परिने मी नदीची स्वछता करू शकते आणि माझे उत्तम स्वास्थ्य हा त्यावरचा बंपर बोनस’! ‘नदीतील ७०% पेक्षा जास्त प्रदूषणाचा वाटा हा आपल्याच घरातून जाणाऱ्या सांडपाण्याचा आहे’ हे विदारक सत्य मनाला सलायला लागले . जीवनशैली पर्यावरणपूरक बनवणे हाच त्यावरचा एकमेव उपाय !  हे नक्की व्हावे कसे ? करावे काय काय आणि कसे?

 माझ्या डोळ्यासमोर आल्या माझ्या आज्या, पणज्या, मोठी आत्या …. अशा  कितीतरी. आजी दुधाच्या रिकाम्या झालेल्या भांड्यात कणिक भिजवून दूध -साईचा कणही वाया घालवायची नाही, पणजीचे डोळे  अंधुक असले असले तरी पानात टाकलेले तिला बरोब्बर दिसायचे आणि तिच्या धाकाने सगळ्यांचे ताट स्वच्छ व्हायचे, वर ‘खाऊन माजा, टाकून माजू नका’ हा धडाही गिरवला जायचा. कामवाली ठकू राखेने भांडी घासायची आणि ओंजळी ओंजळीने, दोन घमेली पाण्यात, दोन घमेलीभर  भांडी लखलखून चमकायची. हे होते आजच्या भाषेतील “reduce” हे पर्यावरणातील तत्व.

 सुट्टीत सगळे जमल्यावर तर आया-आज्या, पोरे-नातवंडांच्या वापरलेल्या कपड्यांचा जंगी exchange एक्स्पो इव्हेंट लावायच्या. आजीची आपल्या सगळ्या पोरांकडे फेरी असायची तेव्हाच ‘आंद्याला हा स्वेटर लहान व्हायला लागला, धाकट्या चंद्याला बरोबर बसेल हे तिने हेरलेले असायचे, त्यानुसार कपड्यांची अदलाबदल व्हायची. फ्रॉक च्या बदल्यात वापरलेले का असेना, पण परकर पोलके मिळाल्याचा कोण आनंद होता.  हे आजचे  “reuse”, आणि सणावाराशिवाय  कोणत्याही नवीन कपडे, वस्तुंना, गोडा धोडाला “refuse’ च असायचे तर आई – काकूंची जुनेरे गोधड्यांतून renew होत. अशी हजारो उदाहरणे. आणि मुख्य म्हणजे हे कोणत्याही विद्यापीठात जाऊन शिकलेले ज्ञान नव्हते तर ती प्रतिष्ठेचा, बडेजावाचा अभिनिवेश न बाळगता सहज स्वीकारलेली, साधी सोपी जीवनपद्धती होती.

         थोडक्यात ‘go back to your roots’ हा फंडा आमलात आणायचा तर!  मागे वळून बघायचं तर -आई आजी अंतर्धान पावलेल्या. पण ऋषितुल्य शास्त्रज्ञ NCL चे डॉ. प्रमोद मोघे सर आणि त्यांची टीम मदतीला होतीच. सर्वात आधी आठवले ते आईचे भरपूर कोमट तेल लावून नंतर कचोरा, वाळा, नागरमोथया ने सुगंधीत शिकेकाईने खसखसून न्हायला घालणे. नंतर उन्हात मोकळे केस वाळवणे. गावात आठवडे बाजारात किंवा भीमाशंकरच्या महाशिवरात्रीच्या यात्रेत जंगलात रहाणारे आदिवासी शिकेकाईच्या शेंगांचे ढीग लावून ते विकायला बसायचे. आज त्याच भागातल्या आदिवासी तरुण मुले – मुली चार- आठ  आण्याचे, नित्कृष्ठ दर्जाचे शाम्पू सॅचेज वापरतात.

….. शाम्पू च्या कृत्रिम फेसात असे अस्सल अनुभव हरवल्याची पहिल्यांदाच जाणीव झाली. बाजारात जाऊन शिकेकाई आणल्यावर घरात आणि मैत्रिणींमध्ये ‘हाहाकार’ माजला अर्थात हसेच झाले आणि ‘शेवटी गावंढळच’ असे दबके टोमणेही उमटले. आता मला शिकेकाई आणि रिठ्याचे शास्त्रीय गुणधर्म माहित होते आणि शाम्पू ने उधळलेले गुणही. शिकेकाई हा नैसर्गिक साबण आहे तर बाजारू उत्पादनांतील  सोडियम लॉरेल, सल्फेट, ट्रायकलोसॅन अशा अनेक विघातक रसायनांनी, सुगंधांनी, नाशकांनी, माणसांना आणि निसर्गाला उध्वस्त करणारा बाजार मांडला आहे . असे शाम्पू, पेस्ट, डिटर्जंटस, सौंदर्य प्रसाधने किती सहाय्यक आणि किती विघातक अशी तुलना केली तर ??

       या गोष्टी पैसा फेकून पटकन कुठूनही घेता येतात , झटकन वापरायला खूप सोप्या, बर कोण्या प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वतःचे गुळगुळीत, झुळझुळीत केस उडवत आपल्याला खात्री दिलेली,  पण आपण काळी का मेकअपने गोरी, अश्या न पाहिलेल्या हिरॉईनने तुमच्या गोरेपणाची आणि केसांच्या काळेपणाची का खात्री द्यायची ? तुमच्या केसांना कोणते प्रोटीन आवश्यक हे तिने ठरवायचे ?

आपल्या लाडक्या, झोपेत असणाऱ्या रणबीरने तर ‘या’ पेस्टने दात घासताच, रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वर सगळे  प्रवासी बेधुंद नाचणार! …मग काय विचारता….अशी श्वासाबरोबर ताजगी पसरली असती ना तर करोना पसरायला इतके महिने लागलेच नसते.  

…..आणि हो, tv वर टूथपेस्टच्या जाहिरातीतला एप्रन घातलेला, डॉक्टर गंभीर चेहेऱ्याने तुम्हाला “हीच” पेस्ट घ्या असा सल्ला देतो.  पेस्टची जाहिरात करणारा, एप्रन घातलेला हा माणूस डॉक्टरच कशावरून हो ?

            जाहिरातींच्या पुतनामावशीने  बेबी शाम्पू, बेबी पावडर यातून अगदी नवजात बाळांवरही मुक्तहस्ते पान्हा सोडलाय.

या सगळ्यातल्या विषपेरणीचे उत्तर आहे कोणाकडे?

     अश्या मार्केटिंगच्या, स्वप्नाळू -भुरळ घालणाऱ्या वाशिकरणाने आपली सारासार बुद्धी बहुतेक “गहाण’ मोडमध्ये जाते.  यात कोणालाच किंवा स्वतःलाही दोषी ठरवायचा हेतू मुळीच नाही कारण शाळा कॉलेजमध्ये हे तुम्हा-आम्हाला कधी शिकवलेच गेले नाही. औपचारिक शिक्षण म्हणजे काहीतरी अगम्य गोष्टींचे ज्ञान, त्याचा आणि प्रत्यक्ष आयुष्याचा दुरान्वये पण संबंध येऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतली गेलेली असते.

   ….. तर कित्येक वर्षांनी ‘शिकेकाई मिळते का हो तुमच्या दुकानात? काय भाव?’ या चौकशीतून औपचारिक पर्यावरणीय प्रयोगांना सुरुवात झाली. Toxin free lifestyle हाच महामंत्र ठरला! पर्यावरण पूरक गोष्टीच तयार करायच्या आणि वापरायच्या. नेहेमीचे कारण सांगितले जाते की अश्या गोष्टींना आमच्याकडे अजिबात वेळ नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत शिकेकाई, रिठे वाळवणे, दळणे हे नेहेमीच्या हळद, तिखटाबरोबरच दळून आणले गेले. वर्षभराची साठवण झाली.

  शाम्पूची महिन्या दोन महिन्यांनी नवी प्लास्टिक  बाटली विकत आणणे, त्यासाठीचा वेळ, पैसा, नंतर ती फेकणे आणि निसर्गात कचरा बनून रहाणे, त्याउप्पर त्यातील रसायनांचा आपल्या शरीरावर, नदीवर आणि एकूणच पर्यावरणावर होणारा घातक परिणाम…  याउलट saponin सारखा नैसर्गिक detergent देणारी , वर्षभर केसाबरोबरच, तांब्या -पितळी भांडी, दागिने आणि अगदी नदीचीही  स्वछता करणारी शिकेकाई आणि रसायनयुक्त, नदी- त्यातील जीवसृष्टी उध्वस्त करणारा शाम्पू याची तुलना कोणी करू शकते? दोन्हीची life cycle assessment अर्थात जीवन प्रवास आणि परिणाम याचा लेखाजोखा कोणाचेही डोळे खाडकन उघडेल.

      शाम्पू ऐवजी मी शिकेकाई वापरली म्हणजे झाले का पर्यावरणाचे महान कार्य ? घरातूनच नदी स्वच्छ झाली का ? असा प्रश्न प्रत्येक ‘मी’ ला नक्की पडेल. आपली जीवनशैली नदीसाठी पर्यायाने आपल्या सर्वांसाठीच बदलण्याची गरज आहे. मीही घरातल्या बाजारू वाहिवाटेला फाटा देऊन घरीच  रिठा -शिकेकाई कपड्यांचा साबण, फळांच्या उरलेल्या सालींपासून bio -enzyme, भांड्याची पावडर, फेस पावडर असे कित्येक प्रयोग घर नोकरी सांभाळत करून बघितले. त्याविषयी सांगेनच  नंतर.

      पण विश्वास ठेवा, घरगुती कामातच हे सगळे होऊन जाते, त्यासाठी खूप वेगळा वेळ नाही द्यावा लागत… हो ,थोडा mindset जरूर बदलावा लागेल. नवीन गोष्टी स्वीकाराव्या लागतील, ज्या तुमच्या – आमच्या, नदी – निसर्गाच्या शाश्वतते साठी आवश्यक आहेत. whats app वर जेव्हढा रोज सरासरी वेळ देतो त्यापेक्षा कमीच वेळ घरगुती उत्पादने करायला लागतो. फळांच्या साली कचऱ्याच्या डब्यात टाकण्याऐवजी बरणीत गूळ पाणी घालून ठेवा… मधून मधून हलवा… तीन एक महिन्यात संपूर्ण घरासाठीचे सफाई द्रावण तयार होईल. अशा कितीतरी गोष्टी. पैसे तर वाचतीलच पण ‘आपण नदीसाठी काहीतरी करतोय हे समाधान मोलाचे नाही का ?   

   आताशा कधी झुळझुळतं लहानपण डोळ्यात साठवत, गावातल्या माझ्या मीना नदीच्या काठाजवळ जाऊन पाण्याला स्पर्श करायचा प्रयत्न केला तर लांबूनच कोणीतरी इशारा देतं ‘ ओ बाई, कशाला जाता त्या घाणीमधी? अवो  समदी गटारं सोडली हायत, लै घाण हाये तिथं’

    मी लहान होऊन बागडत पोचते कधी मिनाईच्या काठी … कोणी ओंजळीतल्या पाण्याने तहान भागवतोय  तर बाया बापड्या हांडे काळश्या घेऊन पाणी भरताहेत, उंबर-करंजानी दाटलेले काठ पक्षीगणांनी किलबिलताहेत ….मी  खळाळत्या पाण्याकडे झेपावते …. कोणी आजी ओरडते ‘ ए s s पोरी …. जपून ग, फ़ुड नगस जाऊ.. जोरकस खळाळ हाये…पाण्याला लैच ओढ हाये बरका’.

अशा मनातल्या नद्यांसाठीच, तिच्या ‘पाताल-भूतल-व्योम’ अस्तित्वासाठी, ‘जीवीतनदीसाठी’ आपण कृतिशील होऊयात.  घराघरातले छोटे  उगम परस्परांना  मिळतील आणि  अविरल- निर्मल जीवन  नक्की प्रवाहित होईल!!

 

By Dr. Swati Dixit, Head of Department – Geography, 

Symbiosis College of Arts and Commerce

Swati Dixit

Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
Notify of