Need for new strategy

Need for new strategy

आता एक निश्चित झाले की केवळ नदी संवर्धन आराखडा तयार करणे पुरेसे नाही. तो आराखडा अमलात येण्यासाठी नदीला प्रशासनाच्या नजरेत प्राधान्य मिळाले पाहिजे.

प्रशासनाच्या योजनेत नदीला तेंव्हाच प्राधान्य मिळेल, जेंव्हा नागरिक नदीला प्राधान्य देतील. नदी आणि नदी पात्रात स्वतः कचरा टाकणार नाहीत, आणि असलेल्या कचर्याबद्दल/ अतिक्रमण आणि इतर नदीला मारक गोष्टींबद्दल आवाज उठवतील.

ह्यासाठी नागरिकाना नदीबद्दल काहीतरी वाटणे गरजेचे आहे.

जेंव्हा आपण पाणी भरायला नदीवर जात होतो तेंव्हा नदीत कचरा टाकू नका हे सांगायची गरजच नव्हती. आपण नदीत कचरा टाकला तर हे दूषित पाणी उद्या आपल्याला प्यावे लागणार आहे हे माहित होते.

आता तसे नाही. पुण्याला पाणी पुरवठा होतो तो 4 धरणांतून. ही 4 ही धरणे, पुणे शहराच्या upstream ला, म्हणजे, नदीप्रवाहाच्या वरच्या बाजूला आहेत. त्यामुळे पुण्यात नदी कितीही प्रदूषित झाली तरी त्याचा आपल्याला त्रास होणार नाही, हे पक्के माहित आहे. आणि त्यामुळेच ही बेफिकिरी.

लोकांना नदीजवळ आणणे, नदीबद्दल प्रेम निर्माण करणे, शहराचे नदीशी तुटलेले नाते परत जोडणे, हे आम्ही उद्दिष्ट ठरवले खरे, पण नक्की काय करायचे, ह्याची काहीच योजना समोर नव्हती. तसे आधी पुण्यात कुठलेही प्रकल्प झाले नव्हते, ज्यातून मार्गदर्शन मिळू शकेल.

मागच्या ब्लॉग मध्ये म्हणले तसे, परत पहिल्या पायरीवर आल्यासारखे वाटले. “काहीतरी करायचे आहे, पण नक्की काय हे कळत नाही”, ही स्थिती परत अनुभवली.

मुठा –> मुळा-मुठा -> भीमा -> कृष्णा -> बंगालचा उपसागर असा आपल्या नद्यांचा प्रवास आहे. भीमा नदीवरचे महाराष्ट्रातले शेवटचे धरण (terminal dam), सोलापूर जवळ उजनी येथे आहे. आपल्या नद्यान्मधले सर्व प्रदूषण भीमा नदीवाटे तेथे जमा होते.

गोळे सरांनी तेथला अभ्यास केला होता. पाण्यावाटे पसरणारे रोग, म्हणजे कॉलरा आणि टायफॉईड तेथे प्रचंड प्रमाणात आहेत. ह्या दोन रोगानी ग्रस्त व्यक्ती नाही असे घर तेथे सापडत नाही असे सरांनी म्हणले होते. आता तर परिस्थिती आणखी भीषण आहे.

ह्या पाण्यामुळे त्या भागातील भूजल ही दूषित झाले आहे. विहिरींचे पाणी त्यामुळे प्रदूषित आहे. माणसांबरोबरच तिथल्या गाई-गुरान्मध्येही अनेक रोग आढळून येतात.

शिवाय नदी पुण्यानंतर ज्या गावातून जाते तिथल्या सगळ्या लोकांनाही पुणे शहराने प्रदूषित केलेले पाणी प्यावे लागते.

डॉ. प्रमोद मोघे ह्यानी सांगितलेल्या, आपल्या नदीतील 70% प्रदूषण आपल्या घरातून जाणार्या पाण्यातून होते” ह्या वस्तूस्थितीला धरून, मी माझ्या घरातून नदी कशी स्वच्छ ठेवू शकतो/ शकते हा धागा पकडून पुढे जायचे ठरवले.

आपण दैनंदिन आयुष्यात काय काय रसायने वापरतो, ती आपल्या घरातून कुठे जातात, शेवटी नदीत कशी जातात, आणि पुढच्या लोकांना त्याचा कसा त्रास होत आहे, त्यांना आरोग्याच्या समस्या कशा निर्माण होत आहेत हे सांगू लागलो. (ह्याबद्दल सविस्तर ह्या लिंक वर, https://www.jeevitnadi.org/toxin-free-living/). विविध गट, संस्था, सोसायटी येथे presentations सुरु झाली.

आपण कोणीच नदी ह्या शहरातून पुढे जाते, कशी जाते, पुढे कुठल्या नदीला मिळते, कुठल्या समुद्राला मिळते, नदीत टाकलेल्या कचर्याचे काय होते, हा विचारच कधी केला नाहीये हे जाणवत गेले.

ही सर्व माहिती जशी सुरुवातीला आम्हाला नवीन होती, तशीच presentation ला आलेल्या लोकांसाठीही नवी होती.

शिवाय नदी-प्रदूषणामध्ये माझा काही सहभाग आहे ह्याचीही जाणीव सगळ्याना नवीन होती. Presentation च्या आधी आम्ही विचारायचो, नदी कशामुळे प्रदूषित होते? उत्तर असायचे, कारखाने/ शेती. शिवाय ओढ्याकाठी/ नदीजवळ लोक प्रातर्विधी साठी बसतात, त्यांच्यामुळे नदी खराब होते.

मोघे सरांकडून घेतलेले ज्ञान, Internet वरून, पुस्तकांतून मिळवलेली माहिती जीवितनदीचे सदस्य लोकांपर्यंत पोहोचवू लागले.

नदी ही पुणे शहरात सम्पत नाही. पुढे ती ज्या गावान्मधून वाहते, त्यांना पुणे शहराने केलेल्या प्रदूषणामुळे काय त्रास होत आहे, ह्या बद्दल जनजागृती करू लागलो.

उजनी परिसरातल्या लोकांच्या समस्या, त्यांना उद्भवलेले आजार हे ऐकून लोक हळहळायचे. आपल्यामुळे हे होत आहे हे कळल्यावर त्यांना अपराधीही वाटायचे. आपण काय करू शकतो, हे प्रदूषण कसे टाळू शकतो ह्याबद्दल प्रश्न यायचे, चर्चा व्हायची.

लोकांच्या प्रतिक्रियांवरून, आमची presentations परिणामकारक होत होती ह्यात शंकाच नव्हती. लोकान्मध्ये जागृती होत आहे. बदल व्हायला सुरुवात होणार ह्या विचाराने आम्हीही खूष व्हायचो.

आपण पुण्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे, त्यांना उजनी परिसरात प्रदूषित पाण्याने होणार्या समस्यांबद्दल सांगायचे, म्हणजे हळूहळू पुण्यातील लोक आपली जीवनशैली बदलतील, नदी स्वच्छ होईल.

हा खूप भाबडा समज होता, हे नंतर जाणवू लागले. एखाद्या गोष्टीबद्दल काही वाटणे आणि ती परिस्थिती बदलण्यासाठी काही करणे ह्या दोघांत खूप अंतर आहे. कृती एवढी लगेच घडत नाही. किम्बहुना कृती घडून येणासाठी हे ज्ञान पुरेसेही नाही.

आम्हाला स्वतःच्या अनुभवावरून ह्याची जाणीव होऊ लागली. सगळे जाणून, पटून, आम्ही तरी घरी सगळे बदल लगेच कुठे करू शकलो होतो. वर्षानुवर्षाच्या सवयी बदलणे तितके सोपे नसते.

पुढे हे कळत गेले की लॉजिक ने बदल घडून येत नाही. आता, आपण नियमित व्यायाम केला पाहिजे, ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असते, हे सगळ्यानाच माहित आहे की. आपण किती जण रोज व्यायाम करतो? म्हणजे एखादी गोष्ट बुद्धीला पटणे आणि ती प्रत्यक्षात आचरणात आणणे ह्या भिन्न गोष्टी आहेत.

एखादी गोष्ट आचरणात आणण्यासाठी ती मनाला तेवढ्या ताकदीने भिडली पाहिजे. म्हणजे नुसती बुद्धीला पटून उपयोगी नाही, तर भावनेला हात घातला पाहिजे.

धुम्रपान आरोग्याला हानिकारक आहे हे धुम्रपान करणारे लोकही जाणतातच. सिगरेटच्या पाकिटावर फुप्फुसाच्या चित्रातून सिगरेटच्या दुष्परिणामांचे दाहक वास्तव सांगितलेले असते. पण ते चित्र पाहून किंवा डॉक्टरांकडून धुम्रपानाचे दुष्परिणाम जाणून, किंवा तिर्हाईताचे अनुभव ऐकून, कोणी धुम्रपान सोडलेले तुम्ही पाहिले आहे का?

पण अगदी जवळच्या व्यक्तीला धुम्रपानामुळे फुप्फुसाचे विकार होतात/ कर्करोग होतो आणि अगदी चेन स्मोकरसुद्धा तात्काळ सिगरेट सोडतात. कारण भावनेला हात घातलेला असतो. नुसत्या लॉजिकच्या पतळीवर आता गोष्टी नसतात.

आम्हाला जाणवले, आपल्यालाही हाच “selfish gene” शोधायचा आहे. भावनिक आव्हान नसेल तर बदल घडणार नाही.

त्या, तिथे उजनी मधल्या लोकांना त्रास होतो म्हणून हळहळण्या व्यतिरिक्त पुढे आणखी काही होणार नाही. त्यानंतर कृती अपेक्षित असेल तर आपली strategy बदलली पाहिजे हे जाणवले. ह्या strategy बद्द्ल पुढच्या ब्लॉगमध्ये.

ह्या ब्लॉग सिरिजचा उद्देश दुहेरी आहे. आता जीवितनदीचा पसारा खूप वाढला आहे. खूप नवीन सदस्य सामील झाले आहेत, होत आहेत. त्यांना ह्या प्रवासाची माहिती द्यावी, त्या निमित्ताने जीवितनदीचे documentation करावे ही इच्छा आहे.

एखादा प्रकल्प सुरु करताना काय अडचणी येतात, खाचखळगे काय असतात, त्याची थोडीफार कल्पना आणि अनुभव आम्हाला आला आहे. आम्ही 5 वर्षांपूर्वी होतो त्या परिस्थितीत आत्ता असणार्या सहकार्याना आमच्या अनुभवाचा फायदा व्हावा ही मनापासून इच्छा आहे.

जीवितनदीमुळे आम्हाला केवळ नदीच नाही तर, मानवी स्वभावाबद्दल ही खूप कळत गेले. त्याचा फायदा लोकसहभागातून करायच्या कुठल्याही उपक्रमासाठी होईल अशी आम्हाला आशा आहे. आपल्या देशात कुठल्याही विधायक कामासाठी झटणार्या व्यक्तीने स्वतःला एकटे समजू नये, हताश होऊन लढा सोडून देऊ नये, आमच्या अनुभवाचा त्यांना फायदा व्हावा, अशी आमची मनापासून इच्छा आहे.

अदिती देवधर – संस्थापक ,संचालक – जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन

 

 

Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
Notify of