Nirmalya Management Project at Mula River Bank, Aundh

Nirmalya Management Project at Mula River Bank, Aundh

This is the blog by Jeevitnadi Founder-Director Shailaja Deshpande about Nirmalya Management project at Mula river bank, near Rajiv Gandhi Bridge, Aundh, one of the stretches adopted by Jeevitnadi under its “Adopt a River Stretch” program

निर्माल्य खत प्रकल्प – राजीव गांधी पुलाजवळ

गेल्या पाच वर्षाहूनही अधिक काळ नदीवर कम करतोय आम्ही. दररोजचा दिवस काही नवी आव्हानं घेऊन येतो.

सध्याच्या नद्यांची दुर्दशा कोणालाच नवी नाही, तसं हे पण नवीन नाही कि तिच्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत. सध्याच्या कोरोनाच्या या घरबंदीच्या काळात तर अगदी पुराव्यानिशीच सिद्ध करून दाखवलंय. आज गंगा मातेचे हरिद्वार आणि हृशिकेशचे फोटो पहिले, कि तिचं हे निर्मळरूप आपल्याला या जन्मीच पाहायला मिळतंय “ किती भाग्यवान आपण” असच वाटत न?

काहीतरी चुकत गेलो. आणि सगळंच हातून निसटत गेलं ! अगदी हेच नेमकं आम्हा नदीच्या योद्ध्यांना कबूल नाही.Albert Einstein म्हणतात , “ We can’t solve problems by using the same kind of thinking we used when we created them.”

अगदी असच काहीसं राजीव गांधी पुलाजवळच्या गणेश घाटावरच्या नदी योद्ध्यांच्या मनात चालल होतं. ऑगस्ट २४, २०१७ पासून दर शनिवारी आम्ही आमच्या मुळाई जवळ जमतो. हा किनारा आम्ही दत्तक घेतलाय. हो दत्तकच ! ज्या माईने युगानुयुगे आपल्याला जीवन दिलं तीच आता मृतप्राय होत चालली आहे. तिची काळजी आपणच घ्यायला हवी आता ! सुरुवातीला आम्ही फक्त दोघीच होतो, आता ही संख्या वाढत वाढत २५ झाली आहे. काठाची स्वच्छता , लावलेल्या झाडांची निगा, नवीन झाडे लावण्यासाठी नियोजन, अशी खूप कामे चालू असतात.

यामध्येच आमचा सगळ्यात मोठा प्रश्न होता “ निर्माल्य” औंध, सांगावी, बोपोडी परिसरातील नागरिक राजीव गांधी पुलावरून जाताना भराभर नदीत निर्माल्य टाकायचे. अजूनही टाकतात म्हणा. साधारण सकाळी सात वाजल्यापासून हा प्रकार सुरु व्हायचा. office ची वेळ झाली कि नुसता ऊत यायचा. किती सोप्पं आहे न! भल्या मोठ्या गाडीतून उतरून नेम लावून नदीत निर्माल्य भिरकावून द्यायचं ! प्लास्टिक पिशवी सकट..

आम्ही हताशपणे टाकलेल्या पिशव्या मोजायचो, दर दोन मिनिटाला एक पिशवी याप्रमाणे नदीच्या डाव्या आणि उजव्या काठावरून ही फेकाफेक चालू व्हायची. गौरी, गणपती, नवरात्र, दुर्गामातेचा उत्सव, मोहर्रम या उत्सवांची आपल्याकडे अगदी रेलचेल असते. शिवाय याबाजुला सगळी मिश्र लोकवस्ती आहे. कोणाचा तरी कोणता तरी सणवार चालूच असतो. मग तर पाहायलाच नको. पोतीभरून सगळं नदीत.बांबूचे सांगाडे, जुन्या photoframe, देवघर, जे काही असेल ते “स्वाहा “ आपल्याकडे म्हणच आहे ना, “ गंगामाई सगळं पोटात घेईल” आपल्याकडे गंगा म्हणजे, प्रत्येक गावातून वाहणाऱ्या नदीला गंगाच म्हणतात. अरे ! काय पोटात घेईल, आणि किती? अशाचं प्रथांनी उगाचच अश्या गोष्टीना खत पाणी मिळालंय आणि त्याची फळ आपण भोगतो आहोत. कारण जे नको ते नदीत . नदी काठ सफाई करताना आम्हाला गादीउश्यांपासून, औषधे ते mobileपर्यंत काहीही मिळत.

पण इथे निर्माल्याचा प्रश्न खरंच खूपच मोठा होता. मग आम्ही हातानेच लिहून board तयार केले, हिंदी, इंग्लिश आणि मराठीत, “ नदी आमची माय, हिच्यात कचरा टाकायचा नाय “ आमच्यातले काहीजण पाळीपाळीने पुलावर उभे राहायला सुरुवात केली. शिवाय हातात दोन पिशव्या, एक निर्माल्य गोळा करण्यासाठी आणि एक प्लास्टिक जमा करण्यासाठी. स्कूटर किंवा गाडी पुलावर थांबली कि धावत सुटायचो. हात जोडून विनंती करून, निर्माल्य काढून घ्यायचे आणि पालिकेच्या कर्मचार्यांना द्यायचे. पण हे किती दिवस चालणार?

काहीतरी नवा प्रयोग, नवा दृष्टीकोन, वेगळा विचार आवश्यक होता. इच्छा असली कि मार्ग सुचतातच. या घाटावर पेशवे कालीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. मंदिराची देखरेख करणाऱ्या भाविक स्त्रियांची आणि आमची आत्तापर्यंत गट्टी जमली होतीच. तसेच तिथे काही विठ्ठल मंदिराचे देणगीदार, औंध मधील वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक असे खूप जण येत असतात. त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडायला सुरवात केली. आपलं मंदिर छान आहे. जागाही भरपूर आहे. इथे आपण “ निर्माल्य खत प्रकल्प” चालू करूया का?

सगळे हो हो म्हणाले, पण कोणी पुढाकार घ्यायला तयार नाही. यामागची ग्यानबाची मेख अशी होती, कि एक वेळ प्रकल्पासाठी जीवित नदी संस्था देणगीदार उभे करेलही , पण त्याची निगराणी कोण करणार? आम्ही आठवड्यातून एकदा जातो तिथे. यासाठी सुरवातीला रोज निगराणी करणे आवश्यक होते.तसेच जर हा प्रकल्प मंदिरानेच उचलून धरला तरच तो टिकण्याची शक्यता.यासाठी आम्ही हर प्रयत्न करत होतो.

तिथे एक निसर्गप्रेमी कार्यकर्ता होता, राहुल जुनवणे नाव त्याचं, त्याला ही कल्पना आवडली. तो म्हणाला देवळातल्या बायकांशी बोलूया. आमच्या बरोबर गणेश कलापुरे म्हणून एक उत्साही कार्यकर्ता पण आहे. त्याने बायकांना जमवण्याची जबाबदारी घेतली. त्याने गावातल्या बायकांना निरोप दिला. मग आम्ही भेटलो. चांगल्या तीनचार बैठका झाल्या. बायका निगराणी करायला तयार झाल्या.

पण याला खर्चही होताच न. देवाच्या मुकुटाला, देवळाला पिवळा धम्मक रंग फासायला, जेवणावळी घालायला देवळाला देणगीदार मिळत होते, पण याचांगल्या कामाला देणगीदार काही मिळेना.खर म्हणजे देवळाला भरपूर उत्पन्न आहे. पण मानसिकता नाही. हीच अवस्था सगळ्याच देवळांची आहे. एवढी मोठी पैसेवाली देवस्थाने पण सगळ्यांचे निर्माल्य नदीत जाते.

शेवटी आम्ही हा गुंता सोडवायचा हे पक्कं केल. काही दानशूर मिळतातच ना! तसा आम्हाला पण मिळाला. खत प्रकल्पासाठी किती मोठी पेटी लागेल, कुठे ठेवायची इत्यादी सर्व करायला निर्मलाताई कांदळगावकर पुढे आल्या. त्यांनी दहा महिन्याची जबाबदारी घेतली. मे२०१८ मध्ये आम्ही त्यांना ७५० किलो निर्माल्य मावेल अशा पेटीची order दिली. आठ दिवसात पेटी आली. राहुल जुनवणे यांनी छान कल्पना काढली. तो म्हणाला, ताई अधिक महिना सुरु होतोय एक जूनला . आमच्याकडे मोठे कीर्तनकार येतात कीर्तनाला , त्यांच्या हस्ते उदघाटन करूया, आम्हाला कल्पना आवडली. मी म्हटलं, नुसतं उदघाटन नको, त्यांना आपण नदी आणि माती, दोघीही आपल्या माय आहेत , हे भक्तांना सांगायला विनंती करूया. राहुलने कीर्तनकारांची गाठ घालून दिली. त्यांना आमचा प्रकल्प आणि नदी शुध्धीकरणाचे महत्व कीर्तनातून सांगायची विनंती केली. त्यांनी ती लगेच मान्य केली. अशातर्हेने आमचा पुण्यातला पहिलावहिला देवळात बसवलेला खत प्रकल्प, एक जून २०१८, अधिक महिन्याचा पहिला दिवस – या दिवशी झाला. देवळातल्या बायकांनी उत्साह दाखवला. गणेश पण सरसावला. कीर्तनकारांनी विधिवत पूजा केली. पण एक महत्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते. इतक्यांदा त्यांना विनंती करूनही, त्यांनी काही प्रकल्पाबद्दल कीर्तनात सांगितलंच नाही. पण बायका मात्र उत्साही निघाल्या. त्यांची मात्र आम्हाला खूप मदत होते.

आणि अश्या तर्हेने रोजचे निर्माल्य पेटीत पडू लागले. हळू हळू देवळात येणाऱ्या बायकांनी येताना घरातले निर्माल्य आणायला पण सुरवात केली. पुलावर उभे राहून आम्ही येणाऱ्या जाणार्या आणि निर्माल्य फेकणाऱ्या लोकांना खत पेटीची माहिती द्यायला सुरवात केली. ४५ दिवस वाट बघावी लागणार होती खत तयार व्हायला. त्यात पाऊस सुरु झाला. एक दिवस पेटीचे झाकण कोणीतरी उघडे ठेवले, आत सगळे पाणी जाऊन कुजका वास यायला लागला. लगेच निर्मलाताई न बोलावून घेऊन अडचणीची सोडवणूक केली. आम्ही सगळ्यांनी घरातून सुका पाला आणला, तो घातला, थोडी कोरडी माती घातली. आणि प्रकल्प पुन्हा सुरु झाला. निसर्गाची हीच तर किमया आहे. त्याला थोडा आधार दिला कि पुढचे काम निसर्गच करतो. त्यावर कोणाच्या देखरेखीची आवश्यकता नसते.
आता निर्मला ताईना पण उत्साह आला. त्या म्हणाल्या १५ ऑगस्ट ला आपण सगळ्या बायकांची ओटी भरुया.

मग आम्ही देवळात एक छोटेखानी कार्यक्रमच केला. निर्मलाताईनी ओटी भरण्याची जबाबदारी घेतली.राहुल ने mike वगैरे उपलब्ध करून दिले. गणेशने मातीचा नैसर्गिक रंगातला गणपती पूजेसाठी आणला. आदल्या दिवशी, मृणाल आणि देवळातल्या बायकांनी मिळून खत चालले. मृणालने कागदी पिशव्या आणल्या होत्या, त्यात चाळलेले निर्माल्य भरले. आणि दुसर्या दिवशी बायकांना बोलावून ओटी भरून त्यांचा सत्कार केला. सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या. प्रत्येक भाविक स्त्रीने एक गोष्ट आपणहून पुन्हा पुन्हा नमूद केली.

या खताला माश्या, वास, चिलटे आली नाहीत. देवासारखच निर्मळ आहे.. आम्हाला खूप आनंद झाला. आता प्रकल्प उत्तम सुरु झाला. यादरम्यान आणि एक गंमतशीर पण बोध मिळणारी गोष्ट घडली. या बायका आता आमच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत.मृणालशी तर त्याचं वेगळंच नात जुळलंय. आम्ही जेव्हा त्यांना धन्यवाद दिले, तेव्हा त्याचं बोलणं खूप मनाला लावून गेलं, “ ताई! आम्ही देवळात येतो, घराच्या कटकटी इसरायला, पर देवळाच्या मागे जुगाराचे अड्डे पडतात, आम्हा बाया बापड्यांना त्याचा त्रास होतो, पण कोणी लक्ष घालत नाही. पण तुमच्या खताने जादू केली. ही मंडळी यायची बंद झाली”. झालं असं कि, निर्माल्य पेटीच महत्व आजूबाजूच्या लोकांना कळायला लागल, शिवाय आपण नदी घाण करतोय याची पण हळू हळू जाणीव व्हायला लागली. दर्शनाला येताना, लोकं आपल्या घरातून निर्माल्य आणायला लागली आणि सततची येजा सुरु झाल्यामुळे जुगारी अड्ड्यांना आळा बसला.

गेली काही वर्षं आम्ही सतत हेच सांगत आलो आहोत की जर चांगल्या प्रवृत्तीची माणस नदीकाठी यायला लागली, तर नद्या आपोआप स्वच्छ व्हायला लागतील. या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला या खत प्रकल्पामुळे मिळाला आणि आमचा उत्साह आणिक वाढला, ही त्यातली जमेची बाजू.

याचप्रमाणे मग आम्ही दुसरा प्रकल्प मलिंग रस्त्याच्या महादेव मंदिरात बसवला. इथे गर्दी कमी असते. त्यामुळे इथला प्रकल्प पण छोटा आहे.
दरम्यान हळूहळू स्वयंसेवकांची संख्या वाढायला लागली. परिसरातल्या लोकांना जीवितनदी ही संस्था नदीसाठी काहीतरी करतेय एवढं कळायला लागलं. परिसरातले सगळे नगरसेवक आम्हाला ओळखू लागले, घन कचर्याचे तर सगळे कर्मचारी आता आम्हाला ओळखतात. पण इतर खात्यांचे लोक – बांधकाम खाते, कीटक नाशक खाते, drainage खात, सगळ्यांची ओळख तर झालीच, पण आमचा phone गेला आणि खात्याचे लोक नदीवर आले नाहीत, असं सहसा घडत नाही. हा आमच्यासाठी खूप मोठा बदल होता . नवीन स्वयंसेवकापैकी काही जणांनी पुढाकार घेतला. आणि काही दिवसांपूर्वी माननीय आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी घाटावर भेट दिली. त्यांना आम्ही खत प्रकल्प दाखवले आणि विनंती केली की प्रत्येक धार्मिक स्थळांनी आपलं ओला कचरा स्थळाच्या जागेवरच रीचावावा. अश्या प्रकारचे परिपत्रक सरकारतर्फेच निघावे. यामुळे उत्सव तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांमधून येणारा नदीवरचा ताण कमी तर होईलच, पण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, याची पण जाणीव होईल. त्यांना हा प्रस्ताव अतिशय पटला. कोरोनाचे सावट कमी झाल्यावर ते याचा पाठपुरावा करणार आहेत.

या सगळ्यातून एकच सांगायचय, कुठल्याही नैसर्गिक संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी- पक्ष, अधिकार आणि इतर उपाधी बाजूला ठेवून, सामान्य माणूस म्हणून एकत्रित येऊन काम केले तर निसर्ग पण साथ देतोच. मग कोरोना ची घरबंदीची आवश्यकताच नाही. हेच खरे शाश्वत होईल.

Box by Mrinal Vaidya,

Jeevitnadi Core Team Member, Mula River, RGB, Aundh, Adopt a River Stretch

Mrinal Vaidya blog writer

Blog by Shailaja Deshpande,

Jeevitnadi founder, director

Shailaja Deshpande blog writer

Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
Notify of