Punyache Pani #10

पुण्याच पाणी (#१०)

२०१८ च्या सुरवातीला पुणे शहरातील आणि ऑस्ट्रेलियामधील शास्त्रज्ञांच्या संयक्त पथकाने मुळा-मुठा नद्यांमधील सूक्ष्मजंतू विषयी त्यांच्या संशोधनातील निष्कर्ष प्रसिद्ध केले. मानवी आरोग्याला अपायकारक असणारे अनेक जीवाणू यामधे आढळून आले. त्वचा आणि श्वसन मार्गातील संसर्ग, रक्तवाहिन्या आणि मुत्राशयातील संसर्ग, meningitis सारखे गंभीर आजार यांच्याशी संबंधित असलेल्या जीवाणूंच्या प्रजाती त्यात आढळल्या आहेत.

यातील चिंताजनक भाग पुढे आहे. वर्षानुवर्षे होणाऱ्या उत्परिवर्तन (mutation) प्रक्रियेमुळे हे जीवाणू आता कोणत्याही औषधाला दाद देईनासे झाले आहेत. शास्त्रज्ञांच्या गटाने ३० वेगवेगळ्या Anti-Biotics वर केलेल्या चाचण्यांमधून हा निष्कर्ष आला आहे. याचाच दुसरा अर्थ असा कि या जीवाणूंमुळे जर आपल्याला काही आजार झाले तर त्यावर कोणत्याही औषधाचा परिणाम होणार नाही!

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वर्षानुवर्षे रोज प्रक्रिया न करता नदीत सोडले जाणारे मैलापाणी हे यामागील सर्वात मुख्य कारण आहे. नागरिकांचे आरोग्य जपणे हे कोणत्याही शासन आणि प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे. असे असताना आरोग्याशी संबंधित इतका महत्वाचा विषय इतक्या बेजबाबदारीने कसा काय हाताळला जातो? हे सगळे भ्रष्ट आहेत, अकार्यक्षम आहेत वगैरे प्रतिक्रिया यावर अपेक्षितच आहेत. पण यापुढे जाऊन आपण नागरिक म्हणून हे सर्व इतकी वर्ष का सहन करतो? हा बदल व्हावा म्हणून आपण नगरसेवक, महापौर,कमिशनर इत्यादिकडे हि मागणी करतो का? ज्या प्रकारे वाहतुकीच्या सुविधा, ट्राफिकचे प्रश्न, मेट्रो इत्यादि गोष्टींमागे जनतेचा दबाव दिसून येतो तेव्हढ्याच जोरदारपणे आपण स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त नदीचा आग्रह धरतो का? हे प्रश्न आपण आपल्याला विचारले पाहिजेत.

हे जर आपण करत नसू तर शासन/प्रशासन स्वताहून हि कामे पुरेशा गांभीर्याने करेल अशी आशा बाळगणे हि भाबडेपणाची हद्दच आहे! शासनाचा प्राधान्यक्रम अप्रत्यक्षरीत्या जनताच ठरवत असते. लक्षात असुदे ज्याप्रमाणे आपले आरोग्य हि आपली जबाबदारी आहे त्याचप्रमाणे ‘माझी नदी माझी जबाबदारी’ आहे.

अर्थात शासनाने या प्रश्नाकडे पूर्ण डोळेझाक केलीये असं म्हणणे अन्यायकारक होईल. यावर शासनाकडून काय पावले उचलली गेली आहेत? त्याचा एकूण प्रकल्प काय आहे? त्या प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे? हे सगळ पुढच्या लेखात.

या प्रश्नी शासनावर सकारात्मक दबाव आणण्यासाठी काय केले पाहिजे असं तुम्हाला वाटत? प्रत्येक प्रश्नावर भन्नाट आयडिया काढणारे पुणेकर काय सुचवतात बघू!

-मनीष घोरपडे (एक नदीप्रेमी पुणेकर)

Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
Notify of