पुण्याच पाणी (#६)
मागच्या लेखात आपण बघितलच कि पाणलोट क्षेत्र संरक्षित केले नाही तर काय गंभीर परिणाम पाण्याच्या उपलब्धतेवर होतात. त्याचप्रमाणे जर अशा क्षेत्रात मानवी वस्ती अनियंत्रितपणे वाढू दिली तर मग पाण्याच्या शुद्धतेवर सुद्धा त्याचा परिणाम होणारच.
पुण्याच्या पाण्याला एक प्रकारची unique गोडसर चव आहे. पुण्यापासून आपण जर १०-१५ दिवस लांब फिरायला गेलो तर परत आल्यावर पुण्यातील पाण्याच्या पहिल्या घोटालाच मिळणार समाधान आपण आजही अनुभवतो. याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे पाणलोट क्षेत्रात कमी वस्तीमुळे पाण्यात मिसळणारे अत्यंत कमी प्रदूषण आणि अर्थात पाण्यावर होणारी चांगली प्रक्रिया.
पण जसजशी पाणलोट क्षेत्रात वस्ती वाढू लागेल (फार्म हाउस, रिसोर्ट, township प्रकल्प, lake city लवासा सारखे प्रकल्प) तसे या सगळ्यातील सांडपाणी सुद्धा धरणाच्या पाण्यात येऊ लागेल (आजही येऊ लागलेलंच आहे!). यामुळे प्रक्रिया केंद्रातील व्यवस्थेवर अधिक ताण येऊन शेवटी आपल्याला मिळणारे पाणी अधिक अशुद्ध मिळणार!
पाणलोट क्षेत्रात बहुतांशी ग्रामपंचायती आहेत. त्यांचा प्रक्रिया न करता तसेच सोडून दिले जाणाऱ्या सांडपाण्यावर कोणताही अंकुश नाही. अर्थात तो पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर असणाऱ्या श्रीमंत महापालिकेचाही नाहीये! पण आता तर ‘विकास’ करण्याच्या नावाखाली धरणांभोवती रिंग रोड तयार करण्याची योजना राबवण्याचा घाट घातला जातोय.
जसे या गावांमधील सांडपाणी धरणात मिसळले तर त्याचा परिणाम पुणेकरांवर होतो, तसच पुणेकरांनी सोडलेल्या सांडपाण्याचा परिणाम सुद्धा पुढे कोणावर तरी होणार. आणि तो तर मोठ्या प्रमाणावर होणार, कारण ४०-५० लाख लोकांचे सांडपाणी असणार!
पुणे शहर रोज किती सांडपाणी/मैलापाणी तयार करते? ते सगळे कुठे जाते? त्यातील किती पाण्यावर प्रक्रिया केली जाते? या सांडपाण्याचा पुण्याच्या पुढे असणाऱ्या गावांवर, शहरांवर काय परिणाम होतो? आपल्यावर काय परिणाम होतो?
विद्येचे माहेरघर हे बिरूद अभिमानाने मिरवणाऱ्या पुणेकरांना हे निश्चितच माहित असणार. त्यामुळे मला या प्रश्नावर प्रचंड प्रतिसादाची अपेक्षा आहे!
-मनीष घोरपडे (एक नदीप्रेमी पुणेकर)
Leave a Reply