Story within the story

Story within the story

Muthai River Walk was launched in October 2015 as part of Mutha River Festival. For schools that could not bring students to river walk venue, we decided to take "Story of River" to them. Till now, this program is organised for various schools, workshops, kids camps and other initiatives. Now, with current Covid 19 situation, we adopted online mode. One particular program organised by Work for Equality, really moved us. Presenting musings of that experience.

गोष्टीतून गोष्ट

ऑक्टोबर २०१५ मध्ये जीवितनदीचा “मुठाई नदी फेरी” हा उपक्रम जनवाणीच्या मार्गदर्शनाने आणि मदतीने सुरु झाला. लोकांना नदीजवळ आणणे, नदीबद्दल माहिती देणे, आणि अशा रीतीने नदीबद्दल कुतूहल निर्माण करणे हा त्याचा उद्देश. नदी फेरीला येऊन गेलेल्या लोकांचे नदीवरचा पूल ओलांडताना नदीकडे लक्ष जाते, नदी फेरीत नदीबद्दल सांगितलेली काहीतरी गोष्ट आठवते.

डॉ. राजगुरू ह्यांच्याकडून आम्हाला नदीचा इतिहास कळला. आपल्या नदीचे वय साधारण १ कोटी आहे हे आम्ही नदी फेरीत आवर्जून सांगतो. त्यामागचा भूगोलही सांगतो. नदीकडे बघायचा दृष्टीकोनच ह्याने बदलून जातो हा आमचा अनुभव आहे. एक तर नदी इतकी गृहीत धरलेली असते की तिच्याबद्दल फारसा विचारच केलेला नसतो. १ कोटी, म्हणजे, मानव पृथ्वीवर यायच्या आधीपासून ही नदी वाहत आहे, हा विचारच चकित करणारा असतो. म्हणजे, आपल्या शहरातून ही नदी वहात नाही, तर ही नदी होती, म्हणून आपले शहर/ गाव इथे वसू शकले हे लक्षात येते. नदीमुळे आपण आहोत, आपल्यामुळे नदी नाही, ही जाणीव game changer आहे.

मुठेकाठच्या सिद्धेश्वर-वृद्धेश्वर मंदिराच्या घाटावरून ही फेरी सुरु होते. खूप शाळा आणि महाविद्यालये ह्या उपक्रमाशी जोडली गेली. पण त्याचबरोबर अनेक शाळा अशा होत्या की काही अडचणीमुळे त्यांना तेथे येणे शक्य नव्हते. म्हणून आम्ही “नदीची गोष्ट” हा उपक्रम सुरु करून ह्या शाळांपर्यंत पोहोचायचे ठरवले.

Powerpoint presentation वर ही गोष्ट आहे. चित्रांच्या साहाय्याने ही गोष्ट आम्ही पुढे नेतो. अनेक शाळा, मुलांसाठी विविध उपक्रम करणारे गट, असे अनेक ठिकाणी आत्तापर्यंत आम्ही हे कार्यक्रम केले.

नदीचे वय काय म्हणून आम्ही विचारतो, अंदाज करा म्हणून सांगतो. ५०, १००, पेशवेकाल, शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत कल्पना शक्ती जाते. परंतु त्या पलीकडे अंदाज जात नाही. आम्ही सांगतो अंदाज करा, wild guess करा. एखादा मुलगा किंवा मुलगी लाख वर्ष म्हणतात. इतर मुलं त्यांना हसतात. मग Powerpoint वर ऍनिमेशन ने एकेक अंक यायला लागतो. आधी एक येतो, आणि मग शून्य यायला लागतात. एकेक शून्य वाढत जात तसे मुलांचे डोळे विस्फारत जातात. शेवटी १ वर ७ शून्य मुलांनी मोजली की, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे असतात. मग ज्यांना मगाशी १ लाख ह्या उत्तराला हसले असतात, ते माझा अंदाज कसा त्यातल्या त्यात जवळचा होता म्हणून खूष होतात.

आणि इथून गोष्टीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते.

मुलांना सांगते, नुसती ताई म्हणते म्हणून विश्वास ठेवायचा नाही. असं का, असा प्रश्न पडला की लगेच मला थांबवून विचारायचं. त्यामुळे असे गप्पा मारत, प्रश-उत्तरे करत ही गोष्ट पुढे जाते.

 

मार्च महिन्यात असाच एका शाळेत हा कार्यक्रम ठरला होता. परंतु कोव्हीड मुळे ते शक्य झाले नाही. मग, सायली रहाळकर, जिने तो कार्यक्रम आयोजित केला होता तिने विचारले आपण ऑनलाईन करून बघायचा का. तोपर्यंत हा विचारच केला नव्हता. आम्ही ठरवलं करून बघूयात. साधारण १५ मुले, काहींचे आई-वडील आणि शिक्षक, असा तो कार्यक्रम झाला आणि चांगला झाला. असा पहिलाच अनुभव असूनही, मुलांचा प्रतिसाद छान होता. गप्पाच्या स्वरूपात तो कसा होईल, मुलांना कंटाळा येईल का अशी भीती होती तसं काही झालं नाही.

त्यामुळे सध्याच्या परिस्थती तही हा कार्यक्रम घेता येईल, मुलांपर्यंत पोहोचता येईल हा विश्वास निर्माण झाला.

मी २०१२-१३ साली इकॉलॉजिकल सोसायटीचा कोर्स केला, तेथील माझी मैत्रिण, वंदना कुलकर्णी हिने विचारले, Work for Equality तर्फे मुलांसाठी उपक्रम चालतो, त्यात तुला नदीची गोष्ट सांगायला आवडेल का.

त्याप्रमाणे ५ जुलै २०२०, ला हा कार्यक्रम झाला. मुले चाकण, तळेगाव, पुणे परिसरातील आहेत, बरीचशी तिथल्या गावांमधली आहेत, हे Work for Equality च्या प्रभा ताईनी सांगितले. त्याप्रमाणे मी, नकाशावर, मुळा- मुठेबरोबरच इंद्रायणी आणि भामा ह्या नद्यांचा प्रवास ही दाखवला.

झूम वर हा कार्यक्रम सुरु झाला तेंव्हा, काही व्हिडीओ मध्ये, मुले गटांनी बसली आहेत हे दिसत होते. अधून मधून प्रश विचारताना प्रभाताई, येरवडा होम मधल्या मुलांना प्रश्न आहे ना, वगैरे असा उल्लेख करत होत्या. तुमच्या गावातल्या नदीमध्ये तुम्हाला पोहोता येते का, म्हणल्यावर, भामा, इंद्रायणी ही नावे आली, त्याबरोबर एक मुलगी गंगा ही म्हणली. बर्याच वेळा पुण्यातलया कार्यक्रमात, पुण्यातून कुठली नदी वाहते म्हणल्यावर मुले, गंगा, यमुना ही नेहमी कानावर पडलेली नावे सांगतात हा अनुभव होता. पण ही मुलगी बिहार मधली आहे हे कळले.

त्यामुळे खूप कुतूहल निर्माण झाले. मुलांचे गट जिथे होते, तिथे एका लॅपटॉप, किंवा काही ठिकाणी एका फोन वर ४-५ मुले ही गोष्ट बघत आणि ऐकत होती.

प्रश्न भरपूर आले. एक गोष्ट जाणवली, प्रश्न खूप वेगवेगळ्या स्वरूपाचे होते.

जलपर्णी, प्लॅस्टिक, करोना, ह्या सगळ्याबद्दल चर्चा झाली.  आपल्या घरातून किती घातक रसायने नदीत जातात, तेच पाणी शेतीला वापरले जाते, मग ही रसायने पाण्यातून मातीत, तेथून त्या मातीत वाढणाऱ्या पिकांमध्ये आणि तेथून ह्या पिकांमार्फ़त आपल्या जेवणाच्या ताटात हे सांगितले तेंव्हा तिथेच चर्चा थांबली नाही. नेहमी ह्यावर “अरे बापरे”, अशी प्रतिक्रिया येते आणि मग त्यावर उपाय काय वगैरे चर्चा सुरू होते. ती इथेही झाली, पण प्रश्न आला, ताई, मग हे धान्य खाणाऱ्या पक्षांवर ही परिणाम होतो का, त्यांनाही त्रास होत असेल ना. खूप कौतुक वाटलं.

आपलया पोटात ही रसायने जात आहेत, ह्यावरच विचार थांबतो हे पाहिलं होतं. मग थोडा मूळ विषयाच्या पलीकडे जाऊन, ह्या पक्षांना खाणाऱ्या गरुडा सारख्या पक्षांवर कसा परिणाम होत आहे, Bio -magnification  ही संकल्पना त्यांना सांगितली. मग थोडे पुढे जाऊन, जनावरांना दिलेल्या औषधांमुळे गिधाडे कशी नाम-शेष होण्याच्य मार्गावर होती हेही सांगितले. त्या आधी जलपर्णी बद्दल बोलताना ती स्थानिक वनस्पती नाही, इथे तिला शत्रू नाहीत त्यामुळे तिच्यावर इकॉलॉजिकल चेक नाही, तिच्या भरमसाठ वाढीचे हेही कारण आहे, हे सांगितलं होतं. “म्हणजे ताई काहीही करताना ecosystem चा विचार होणे गरजेचे आहे ना”, असे एक मुलगी म्हणाली. मुलं ऐकत होतीच पण त्याबरोबर विचारही करत होती हे पाहून खूप छान वाटलं. आपण holistic thinking ची कशी गरज आहे, हे म्हणतो. हा शब्द माहीत नसून, ही मुले सगळी माहिती समोर ठेवल्यावर ह्या निष्कर्षावर पोहोचली ते पाहून मजा वाटली.

गोष्ट संपल्यावर वंदनाशी बोलणं झालं. तिने work for equality आणि Rainbow Home प्रकल्पाबद्दल सांगितलं. आज त्यांच्या वेबसाईट आणि फेसबुक पेज वर जाऊन ही माहिती वाचली. रस्त्यावर विविध कामे करणारे, जसे फुगे विकणे, सिग्नल ला वस्तू विकणे, भीक मागणारी, अशा मुलांसाठी rainbow homes आहेत. ही मुले आपण होऊन रस्त्यावरचे असुरक्षित आयुष्य सोडायचे ठरवून इथे येतात. सरकारी शाळांच्या इमारतीत ही rainbow homes चालतात. मुलांना चॅरिटी म्हणून हे नवे आयुष्य न देता जो त्यांचा हक्क आहे, तो त्यांना देत आहोत अशा भावनेने हे केले जाते. ही मुले शाळेत जातात. त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घ्यायला, त्यांना तिथे जमवून घेता येईल, अशा ह्यासाठी त्यांचे peers त्यांना मदत करतात.

Work for Equality चा उद्देश ही सर्वाना मुख्य प्रवाहात सामील करून घेणे हा आहे.

मुले एका लॅपटॉप वर/ एका फोन वर ही मन लावून गोष्ट ऐकत होती, त्याचे ही मला खूप कौतुक वाटले. सध्या बहुतांश शाळा ही अशा ऑनलाईन मोड मध्ये सुरु झाल्या आहेत. वर्तमान पत्रातून, समाज माध्यमातून त्याबद्दल बरेच तक्रारीचे सूर ऐकू येतात. त्या पार्श्वभूमीवर तर ह्या मुलांचे आणखीनच कौतुक वाटले.

Anything is inconvenient, only if we decide so; else there are only opportunities to learn something new, to understanding something new, to experience something we never imagined before, isn’t it?

हा खूप सुंदर अनुभव दिल्याबद्दल, वंदना, प्रभाताई आणि सगळ्या छोट्या दोस्तांचे मनापासून आभार.

एक नदीची गोष्ट सांगताना कितीतरी गोष्टी अशा उलगडत गेल्या. मुलांना नदीची माहिती सांगायची हा उद्देश होता, पण ह्या मुलांकडून कितीतरी गोष्टी मी शिकले.

Aditi Deodhar

Founder – Director 

Jeevitnadi – Living River Foundation

Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
Notify of