Actual action is entirely different thing
Experts giving talks about Toxing Free Living

Actual action is entirely different thing

आपण रोज अनेक घातक रसायने वापरतो. टूथपेस्ट, साबण, शाम्पू, कपडे धुण्याचा साबण, भांडी घासायचा साबण, फरशी पुसायचे द्रावण, ह्यांत अनेक घातक रसायने आहेत.

ही रसायाने आपल्या त्वचेच्या सम्पर्कात येतात, त्यांचे fumes आपण श्वासावाटे घेतो. आपल्या घरातून ती Sewage Treatment Plant (STP) मध्ये जातात. पाण्यात विरघळलेली ही रसायने कुठलाच STP काढू शकत नाही. ही सर्व रसायने तेथून नदीत जातात.

ह्यातली बहुतांश रसायने मानवनिर्मित आहेत. पर्यावरणात त्यांचे विघटन होऊ शकत नाही. तेच पाणी शेतीला वापरले जाते. ही रसायने मातीत जातात, त्यावर वाढणार्या पिकान्मध्ये शोषली जातात. पिकांवाटे ही रसायने आपल्या जेवणाच्या ताटात येतात.

पृथ्वी ही closed system आहे. येथून काहीही बाहेर जाऊ शकत नाही, प्रदूषण सुद्धा नाही. एकदा ही रसायने आपण पर्यावरणात सोडली की पुढे कितीतरी हजार वर्षे ती तशीच राहणार आहेत आणि ही आरोग्याला घातक रसायने, आपल्याकडे, आपल्या मुलांच्या जेवणात येत राहणार आहेत.

आमच्या presentation मधून ही माहिती आम्ही देत होतो. रोज किती भयंकर प्रदूषण आपण पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तयार करत आहोत हे सांगत होतो.

पण लोकांना घाबरवून टाकणे, काळजीत टाकणे हा तर आमचा हेतू नव्हता. ह्या सगळ्या माहितीमुळे लोकांना नदी प्रदूषणातल्या आपल्या सहभागाची जाणीव व्हावी; नदी ही आपल्या आरोग्याचा आरसा आहे, हे कळावे आणि त्यांनी आपली जीवनशैली बदलावी, ही आमची इच्छा होती.

आणि त्या साठी केवळ, हे वापरू नका, ते वापरू नका, हे सांगणे पुरेसे नाही. हे नाही तर काय वापरायचे हेही सांगितले पाहिजे.

दैनंदीन वापरातल्या उत्पादनामध्ये काय रसायने असतात, कोणती रसायने घातक असतात, ह्या बरोबरच त्या उत्पादनाना पर्यायही आमच्या presentation मधून देऊ लागलो.

पर्यायांसाठी फार लांब जायची गरजच नव्हती, बरीचशी आपली पारम्पारिक उत्पादनेच आहेत, जसे शिकेकाई, रिठा, मीठ, त्रिफळा चूर्ण, सोडा इत्यादी.

टूथपेस्टला पर्याय म्हणजे दंतमंजन, साबणा ऐवजी उटणे, असे प्रत्येक उत्पादनाला, नैसर्गिक, वर्षानुवर्षे वापरात असलेले आणि त्यामुळे tried and tested असलेले पर्याय सांगत होतो.

आमच्या वेबसाईट वर देखील हे पर्याय, ते बनविण्याची सविस्तर कृती आम्ही दिली.

आधीपेक्षा एक पाऊल पुढे आलो होतो. नदीचे आरोग्य आणि आपले आरोग्य ह्यांचा सम्बंध आहे ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो होतो.

नदी प्रवाहाच्या पुढे, तिकडे उजनी परिसरात राहणार्‍या लोकांचा आता हा प्रश्न राहिला नव्हता. आता हा सगळ्यांचा प्रश्न झाला होता. त्यामुळे पुण्यातील presentation मध्ये आम्ही काय करू शकतो, आम्ही जीवनशैली कशी बदलू शकतो, असे प्रश्न येऊ लागले होते.

जीवितनदी अभियान असा आमचा whatsapp group सुरु झाला. त्यावरही ह्या विषयावर जोरदार चर्चा होऊ लागली.

सध्या वापरात असलेल्या घातक रसायनाना, सदस्य पर्याय शोधू लागले, ते तयार करायची कृती गृप वर पाठवू लागले.

प्रगती झाली असली तरी काहीतरी कमतरता होती.

Presentation नंतर लोकांचा घोळका असायचा, आणि प्रश्न असायचा, ही उत्पादने तुमच्याकडे उपलब्ध आहेत का? किंवा कुठे मिळतील?

आम्ही सांगायचो की ती कशी करायची ह्याची कृती आमच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे, तुम्ही ती स्वतः करू शकता.

गेल्या 3-4 वर्षात अनेक उत्पादक पुढे आले आहेत. पण त्यावेळी फारसे आयते पर्याय उपलब्ध नव्हते. लोकांना presentation नंतर जीवनशैलीत बदल करायची इच्छा असायची, अगदी मनापासून इच्छा असायची. पण बाजारात ठराविक दुकानात जाऊन, शिकेकाई, रिठा ह्यासारखे घटक विकत आणायचे, त्यापासून पुढे वापरण्यासाठी product तयार करायचे, हे वेळखाऊ आहे.

आत्ता घरातली टूथपेस्ट सम्पली आहे. दंतमंजन वापरावे हे मला अगदी पटले आहे. पण हे सगळे घटक घेऊन यायचे, ठराविक प्रमाणात मिसळायचे, आणि दंतमंजन तयार करायचे, ह्यासाठी आत्ता तरी वेळ नाहिए. मग आत्ता पुरती जवळच्या दुकानातून टूथपेस्ट आणणे मला सोपे नाही का? असाच विचार केला जातो. पुढच्या वेळी दंतमंजन नक्की करू असे आपण ठरवतो. परंतु सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अशी perfect वेळ कधी येतच नाही.

त्यामुळे कितीही इच्छा असली तरी हा बदल घडून येणे अवघड होते.

आम्हाला जाणवले, की ही उत्पादने presentation च्या इथे उपलब्ध असतील तर लोक घेतील, वापरून बघतील, आणि हळूहळू जीवनशैलीत बदल घडून येईल. असा काही kit तयार केला तर उपयोग होईल ही जाणीव झाली.

खूप वेळा ह्यावर चर्चा झाली. आम्ही सगळेच आपापले व्यावसायिक आयुष्य साम्भाळून जीवितनदीचे काम करत होतो. त्यामुळे kit साठी अतिरिक्त वेळ देणे शक्य नव्हते.

पण त्यापेक्षाही मोठी अडचण होती की आम्ही स्वतः ते पाऊल टाकायला कचरत होतो.

जाहिरातदार आपल्याला घाबरवून/ प्रलोभन दाखवून त्यांचे उत्पादन विकतात. मग आपण त्यांच्यासारखेच झालो ना. लोकांना सध्या आपण वापरत असलेल्या घातक रसायनांबद्दल सांगायचे, घाबरवून टाकायचे आणि मग, त्या उत्पदनाऐवजी आमची ही उत्पादने वापरा असे म्हणून आपली उत्पादने विकायची, अशी जीवितनदीची प्रतिमा होईल असे वाटायचे.

आत्ता जाणवते, बराच काळ ह्या विचाराने आम्हाला kit तयार करण्यापासून रोखले. तो केला तर बदल घडणे सोपे जाईल, लोक हे घटक वापरून बघतील, हे कळत होते. पण तोपर्यंत जीवितनदी ची जी प्रतिमा तयार झाली होती, त्याला धक्का लागेल, एक व्यावसायिक स्वरूप त्याला येऊन, लोकांचा विश्वास कमी होईल. केवळ आपली उत्पादने विकण्यासाठी आपल्याला ही अतिरंजित माहिती तर सांगत नाहीत ना, असे लोकांना वाटेल, अशी भीती आम्हा सदस्याना वाटत होती.

आपण उत्पादनाची जाहिरात करत नाही, तर एका संकल्पनेचा पुरस्कार करत आहोत, हे नंतर आमच्या लक्षात आले. आणि आमची भीती मागे पडली आणि आमची presentations सुरु झाल्यानंतर साधरण दिड वर्षानी हा “kit” प्रत्यक्षात उतरला.

हे घडले ते जीवितनदीच्या एका हितचिंतक आणि मार्गदर्शकामुळे; आणि ते सुद्धा केवळ 2 आठवड्यात. वर्षभर ज्यावर विचार झाला होता, चर्चा झाली होती, ती गोष्ट घडून आली ती अगदी अचानक. आणि घडली ती इतक्या छान पद्धतीने की आमच्या सगळ्या शंका किती निराधार होत्या हे सिद्ध झाले.

जीवितनदी गट आता लोकांना नुसतेच हे करू नका असे सांगत नव्हता, तर त्यांना पर्याय द्यायला, जीवनशैलीत बदल करायला मदत करायला समर्थ होता.

त्या kit बद्द्ल आणि एकंदर अनुभवाबद्दल पुढच्या ब्लॉग मध्ये.

पण एक नक्की, अनेक वेळा आपण एकाच जागी थाम्बलोय, काही प्रगती होत नाहिए, असे वाटते, आणि अचानक वेगाने गोष्टी घडतात आणि सगळेच चित्र बदलून जाते. सध्या आपण इतक्या क्लिष्ट (complex ला समर्पक शब्द हाच ना? 😊) जगात आहोत, की नक्की काय यशस्वी होईल, एखादी गोष्ट लोक कशी स्विकारतील ह्याचा कयास करणे खूप अवघड आहे.

फेसबूकच्या भाषेत सांगयचे, तर कुठल्या पोस्टला भरपूर लाईक्स मिळतील, आणि कुठली विशेष कोणी बघणार नाहीत, ह्याचा अंदाज येणे केवळ अशक्य आहे.

ह्यावर उपाय म्हणजे “कर के देखो”. प्रत्यक्ष करून बघणे हाच केवळ ह्या अनिश्चिततेवरचा तोडगा आहे.

ह्याचा प्रत्यय पुढेही अनेक उपक्रमान्मध्ये आला.

करून तर बघू, यशस्वी झाले तर चांगलेच आहे, नाही झाले तर आपल्याला अनुभव मिळेल, अशी मानसिकता हळूहळू निर्माण होऊ लागली. अपयशाची भीती कमी झाली.

अदिती देवधर – संस्थापक, संचालक – जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन

 

Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
Notify of