पुण्याचं पाणी (#१४)
लकडी पूल, बालगंधर्व पूल, शिवाजी पूल, झेड ब्रिज, संगम पूल, एस एम जोशी पूल याठिकाणी थांबून खाली बघितलं तर काय दिसत? प्रदूषणाने काळ झालेलं पाणी, जलपर्णी, दोन्ही किनार्यांवर असलेली प्रचंड अस्वच्छता, साचलेला गाळ, प्लास्टिक कचरा, बांधकामाचा राडारोडा, जातायेता अत्यंत भक्तिभावाने पुलावर मधेच गाडी थांबवून निर्माल्य (प्लास्टिक पिशावीसकट) विसर्जन करणारे ‘धार्मिक’ प्रवृत्तीचे लोक आणि बरंच काही….हे सगळ कमी होत म्हणून कि काय मधल्या काळात पालिकेनी भंगार/ जप्त झालेली वाहनेसुद्धा आणून टाकली होती!..
नदी आणि नदीकिनारे हि कचरा आणि टाकाऊ पदार्थ टाकण्याची हक्काची जागा आहे असं समजून आपण वागत असतो. यावर अनेकजण म्हणतील कि अशा लोकांना दंड ठोठावला जात नाही म्हणून आपल्याकडे हे सर्रास चालत. हे काही प्रमाणात बरोबर आहे. जेव्हा समाजातील बहुतांशी लोक एखादी कृती चुकीची आहे म्हणून करत नाहीत तेव्हा राहिलेल्यांसाठी कायदा आणि नियम यांचा बडगा उपयोगी ठरतो. पण जेव्हा नियम मोडणाऱ्यांची संख्या खूपच मोठी असते तेव्हा कोणाकोणावर आणि कुठे कुठे कारवाई करणार? यंत्रणा कुठे आणि किती पुरी पडणार?
कधीकाळी मुळा मुठा नद्यांचे किनारे म्हणजे पुण्याची सौंदर्यस्थळ होती. सौंदर्यपूर्ण घाट, मंदिरे, बागा, उपवने, गर्द हिरवाई यांनी नटलेल्या या किनार्यांनी अनेक कलाकारांना भुरळ पाडली होती. ब्रिटीश काळातील पेंटिंग्ज मध्ये याचं स्पष्ट प्रतिबिंब पडल्याच आपल्याला दिसेल. आणि हि परिस्थिती अगदी ६०-७० च्या दशकापर्यंत टिकली होती हे बर्याच ज्येष्ठांच्या आठवणींमधून कळत. मग गेल्या पन्नास वर्षात असं काय झालं कि पुण्याच सौंदर्यस्थळ असलेले हे किनारे आज ‘अधिकृत कचरापेटी’ बनले?
६१ सालच्या पानशेतच्या महापूर आणि त्यामुळे झालेला विध्वंस हे एक त्यामागच कारण असेल असं वाटत. या पुराचा सगळ्यात मोठा फटका या सगळ्या सुंदर घाट, मंदिरे आणि बागा यांना बसला. त्यामुळे पुणेकरांच्या दिनचर्येचा अविभाज्य अंग असलेल्या अनेक जागा नकाशावरून कायमच्या पुसल्या गेल्या. आणि तेव्हापासूनच बहुधा पुणेकरांचे नदीशी असलेले सानिध्य, जिव्हाळा हे टप्याटप्याने आटत गेले असं दिसते. ज्या परिसराकडे समाज कोणत्याही आत्मीयतेने बघत नाही त्याची कचराकुंडी व्हायला किती वेळ लागणार?
सध्या चाळीशीत किंवा त्यापुढील वयात असेल्यानी आठवून बघा. लहानपणी नदीकिनारी तुम्ही कुठे खेळायला/ फिरायला जात होतात. आज त्या जागेची स्थिती काय आहे? याबद्दल आपल्याला काय करता येईल? पुन्हा एकदा या नदीकिनाऱ्याना गतवैभव प्राप्त होऊ शकेल का? मानवी समाजानेच मुळातील नैसर्गिक सौंदर्य जपून या किनार्यांचे सौंदर्य कलात्मक रचनांमधून अजून खुलवले. आणि नंतर मानवी समाजानेच या सुंदर परिसराची कचरापेटी करून टाकली. त्यामुळे पुन्हा हा परिसर निसर्गसुंदर करणे अशक्य अजिबात नाही.
याबद्दल पुढील काही भागांमध्ये अजून चर्चा करू.
-मनीष घोरपडे (एक नदीप्रेमी पुणेकर)
Leave a Reply