Take first step in faith. You don’t have to see the whole staircase, just take the first step. – Martin Luther King Jr.
पुण्यात पर्यावरणतज्ञ श्री. प्रकाश गोळे ह्यांच्या इकॉलॉजिकल सोसायटी तर्फे “Sustainable Management of Natural Resources & Nature Conservation” हा पद्व्योत्तर अभ्यासक्रम घेतला जातो.
गोळे सर
अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, गोळे सरांकडून, गोळे मॅडम, महाजन सर आणि इतर तज्ञांकडून खूप गोष्टी कळल्या होत्या. आपण इतके वर्ष किती संकूचित विचार करत होतो ह्याची जाणीव झाली होती.
पश्चिम घाटात वृक्षतोड होत आहे, खाणकाम चालू आहे, पर्यावरणाची हानि होत आहे, ह्या बातम्या अधूनमधून वाचत असतो. ते तिकडे पश्चिम घाटात काहीतरी चालू आहे, होत आहे ते वाईट आहे मान्य, पण तिकडे लांब हे चालू आहे. इथे पुण्यात बसून मला त्याचा काय फरक पडतो. माझा काय संबंध? असा विचार कायम करत होतो. अशा अनेक बातम्या आमच्यापर्यंत पोहोचायच्या तर, पण भिडायच्या नाहीत.
हा अभ्यासक्रम केला आणि निसर्गात सगळे कसे एकेमेकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जोडलेले आहे ह्याची जाणीव झाली. महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्यांचा उगम हा पश्चिम घाटात आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणार्या तर सगळ्याच. म्ह्णजे मला पाणी मिळते तेच पश्चिम घाटामुळे. पश्चिम घाट आहे तर मी आहे. म्हणजेच पश्चिम घाटाच्या विध्वंसाकडे मी तटस्थपणे बघूच शकत नाही.
मुळा-मुठा नद्यांची पुण्यातील स्थिती अस्वस्थ करू लागली. नदी प्रदूषित आहे हे आधीही माहित होतेच की. पण त्याचा फारसा त्रास वगैरे होत नव्हता इतके ते दृष्य सवयीचे झाले होते. “नदी कसली निव्वळ गटार आहे” असे म्हणतानाही काही विशेष वाईट वाटत नव्हते. परंतु हा अभ्यासक्रम केल्यावर नदीच्या ह्या अवस्थेत बदल करायचा असे वाटू लागले.
इकॉलॉजिकल सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या ईमेल ग्रुप वर निरांजन उपासनीने सांगितले की त्याने त्याच्या मुलाच्या पहिल्या वाढ्दिवसाला असे वचन दिले आहे की, तुझ्या दहाव्या वाढ्दिवसाला आपण मुठा नदीत पोहायला जाऊ. निरंजनच्या ईमेल मुळे असे वाटणार्या लोकांमध्ये संवाद सुरु झाला, सर्व अस्वस्थ मंडळी एकत्र आली.
नदीच्या ह्या अवस्थेत बदल करायचा आहे, नदीसाठी काहीतरी करायचे आहे एवढेच माहीत होते. नक्की काय करायचे ह्याची कोणालाच कल्पना नव्हती. मग दर मंगळवारी संध्याकाळी भेटायला सुरुवात केली. प्रत्येक जण आपापल्या परिने वाचन करायचा, नदीच्या समस्या समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, वाचलेले/ समजलेले भेटू तेंव्हा सांगायचा. अशा तर्हेने ज्ञानाची देवाणघेवाण, चर्चा सुरु झाली.
सुरुवातीच्या भेटी, चर्चा, ज्ञानाची देवाण-घेवाण
गोळे सरांनी 1982-83 ह्या वर्षात नदी संवर्धनाचा आराखडा पुणे महानगरपालिकेला सादर केला होता. त्यावेळच्या महानगरपालिकेच्या हद्दीतील म्हणजे विठ्ठलवाडी ते बंडगार्डन असा नदीचा सखोल अभ्यास त्यात केला होता.
आम्ही ठरविले, तो आराखडा वाचायचा, समजून घ्यायचा. 1982-83 सालापासून नदीत आणि शहरात खूपच बदल झाले आहेत. सद्य-स्थितीचा अभ्यास करून, सरांच्या आराखड्यातील ज्या गोष्टी आत्ता लागू पडतात त्या, आणि काही ठिकाणी आवश्यक ते बदल करून, असाच नवीन आराखडा तयार करायचा. इकॉलॉजिकल सोसायटीमधून तो आराखडा घेऊन त्याची प्रत केली, काही सदस्यांनी वाचन सुरु केले.
नदीवर/ नदीच्या समस्यांवर काम करणार्या विविध लोकांना भेटू लागलो, त्यांच्याकडून सद्य स्थिती समजून घेऊ लागलो.
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे, येथील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे ह्यानी सांगितले की आपल्या बहुतांश नद्यान्मधील प्रदूषण हे डोमेस्टीक, म्हणजे घरातून आलेले आहे. हे आम्हाला नवीन होते. नदी प्रदूषण म्हणले की आपण कारखान्यांकडे बोट दाखवून मोकळे होते. मोघे सरांनी सांगितले की आपल्या नद्या जवळ जवळ 70% पर्यंत, आपण घरी वापरत असलेल्या विविध रसायनामुळे प्रदूषित होत आहेत.
डॉ. प्रमोद मोघे
आपण घरी रसायने वापरतो?
टूथपेस्ट, साबण, शाम्पू, कपडे धुवायचा साबण, भांडी घासायचा साबण, फरशी/ संडास-बाथरूम धुण्यासाठी वापरात असलेली द्रावणे ह्या सगळ्यात विविध रसायने असतात. आपला वापर करून झाला की ही रसायने आपल्या घरातून जवळच्या सूवेज ट्रिटमेंट प्लॅन्ट (STP) मध्ये जातात. पाण्यात विरघळलेले घटक बाजूला करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने हे घटक, तेथून सोडलेल्या पाण्यातून, तसेच्या तसे नदीत जातात.
ह्याबद्द्ल सविस्तर पुढच्या काही ब्लॉग्स मध्ये बोलू कारण विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे.
मोघे सरांच्या ह्या अभ्यासामुळे आम्हाला दिशा मिळाली. नदी आपल्यामुळे 70% पर्यंत प्रदूषित आहे म्हणजेच नदी 70% पर्यंत स्वच्छ ठेवणेही आपल्याच हातात आहे नाही का?
“नदीसाठी काहीतरी करायचे आहे” ह्या इच्छेला एक आकार मिळायला सुरुवात झाली,
- गोळे सरांच्या आराखड्याचा अभ्यास, त्याच्या आधारे नदीच्या सद्य स्थितीबद्द्ल आराखडा तयार करणे
- मोघे सरांच्या मार्गदर्शनाखाली रसायन-विरहित जीवनशैलीचा अभ्यास व प्रसार
आता जाणवते की ते पहिले पाऊल टाकणे किती महत्वाचे आहे. आमच्याकडे सम्पूर्ण प्लॅन तयार झाला की मगच आम्ही काम सुरु करू असा आग्रह धरला असता तर कधी सुरुवातच झाली नसती.
आता हेच बघा ना. आपण हायवे वरून एका गावाहून दुसर्या गावाला जातो तेंव्हा सम्पूर्ण रस्ता थोडीच आपल्याला दिसत असतो. केवळ काही मीटर रस्ता समोर दिसत असतो. पण आपण रस्त्यात असलेल्या पाट्या, मैलाचे दगड, ह्याच्या आधारे प्रवास सुरु करतो आणि पोहोचतो ना इच्छित ठिकाणी. (गूगल-पूर्व काळात असाच प्रवास करत होतो की 😊) अगदी कुठे चुकलो, तर विचारतो, त्याप्रमाणे आपल्या मार्गात बदल करतो आणि प्रवास सुरु ठेवतो.
कुठल्याही ध्येयाचे हे असेच तर आहे.
सगळा आराखडा पाहिजे हा आग्रह कशाला, पहिले पाऊल तर टाकू, हळूहळू समोरची वाट दिसू लागेल, लोक जोडले जातील, मार्गदर्शक भेटत जातील, गरज लागेल तसा बदल करून, म्हणजेच कोर्स करेक्शन करून प्रवास सुरु राहील.
अदिती देवधर, संस्थापक संचालक, जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाऊंडेशन