Passion First

Passion First

“The best in art and life comes from a center – something urgent and powerful, an idea or emotion that insists on its being.

From that insistence, a shape emerges and creates its structure out of passion.

If you begin with a structure, you have to make up the passion, and that’s very hard to do.”

– Roger Rosenblatt

             साधारण कसे असते, एका उद्देशाने संस्था स्थापन केली जाते, संस्थेचे व्यवस्थापन, व्यवस्था ठरते. कुठले काम करायचे आहे ते ठरविले जाते आणि ती कामे करण्यासाठी योग्य पात्रतेची माणसे निवडली जातात.

आमची सुरुवात झाली ती वेगळ्या पद्धतीने. मुळा-मुठा नद्या जीवित करायच्या ह्या एका ध्येयासाठी आम्ही एकत्र आलो, नियमित भेटू लागलो, चर्चा करू लागलो.

ह्या उपक्रमाला कुठलेही structure असे नव्हते, कुठली hierarchy नव्हती. एक कोणीतरी सांगतय काय करायचे, आणि बाकी तसे करताहेत, अशा role definitions नव्हत्या.

भूमिका आपोआप घडत गेल्या. सदस्यानी आपणहून पुढाकार घेऊन, ज्याना जे सुचेल/ जमेल ते करायला सुरुवात केली.

एका सदस्याने जीवितनदी चा email id तयार केला, आणि दर आठवड्याच्या चर्चेचा सारांश पाठवायला सुरुवात केली. एका सदस्याने गोळे सरांचा नद्यांचा अहवाल जो आमच्या चर्चेचा पाया होता, त्याची scanned प्रत तयार केली, सदस्यांचे email id गोळा करून त्यांना ती प्रत पाठवली. एका सदस्याने जीवितनदीसाठी वेबसाईट आणि फेसबूक पेज तयार केले. एक सदस्याने सगळ्यांची माहिती गोळा केली, कोणाचे काय कौशल्य आहे, कोण किती वेळ जीवितनदीसाठी देऊ शकेल ही माहिती गोळा केली. एकमेकांना सम्पर्क करणे, अधिक चर्चा करणे त्यामुळे शक्य झाले. एक सदस्य पुण्यात नवीन होते. ते रोज सायकल वरून फेरफटका मारून, शहराची ओळख करून घेत होते; त्यांनी नदीची छायाचित्रे काढून नियमित पाठवायला सुरुवात केली. एकूणच शहर इतके झपाट्याने बदलत आहे, की नदी, नदीपात्र आणि आजूबाजूचा प्रदेश कसा बदलला हे समजून घेण्यासाठी त्यांनी त्यावेळी पाठवलेली छायाचित्रे संदर्भ म्हणून उपयोगी पडत आहेत. जीवितनदीच्या संग्रहात ती कायमस्वरूपी सामील झाली आहेत.

ज्याला emerging leadership म्हणतात, ती आम्हाला गटात बघायला मिळाली. कोणीतरी काय करायचे आहे, कसे करायचे आहे, हे सांगण्याऐवजी, “मी कशा पद्धतीने” सहभागी होऊ शकतो/ शकते, माझे कौशल्य, माझे ज्ञान याचा कसा उपयोग करता येईल, हा विचार प्रत्येक सदस्याने केला आणि जीवितनदीच्या गट बांधणीचा पाया तयार होऊ लागला.

आणि सगळ्यात महत्वाचे, आपण एका गटाचा भाग आहोत, आपण एकटे नाही, हे आश्वासन त्यातून मिळाले. नदीची अवस्था बघून जो त्रास व्हायचा, जे दु:ख व्हायचे, ते समजून घेणारे, आपल्या सारखेच नदीच्या अवस्थेने व्यथित होणारे आणखी लोक आहेत, हीच भावना दिलासा देणारी होती.

ह्यातून काही निष्पन्न होईल का, हे त्यावेळी माहित नव्हते, पण ह्याच आश्वासक भावनेसाठी सदस्य, दर मंगळवारी संध्याकाळी, ऑफीस नंतर, घरची जबाबदारी, कामे साम्भाळून, संध्याकाळच्या रहदारीला तोंड देत भेटत राहिले.

एका दृष्टीने ठराविक, साचेबंद असे काही नव्हते हे चांगलेच झाले. त्यामुळे सृजनशीलतेला भरपूर वाव मिळाला. कोणी एक नेता, हे असेच करायचे हे सांगणारा नसल्यामुळे सगळ्यांची सृजनशीलता एकत्र येऊन (collaboration), पुढे जायचा मार्ग आखला गेला. एखादी गोष्ट साध्य करायचे अनेक मार्ग आपोआप धुंडाळले गेले.

अर्थात अगदी सगळेच सकारात्मक घडले असे नाही. ही अनिश्चितता काही लोकांसाठी सृजनशीलतेला वाव देणारी ठरली, मात्र काही लोकांना ती आवडली नाही. त्यांना ती अस्वस्थ करत होती.

नुसतीच चर्चा करतोय, नक्की काय करायचे हे सांगणारे कोणीच नाही, नुसते भेटून काय उपयोग, असाही सूर ऐकू येऊ लागला. आमच्या भेटी सुरु झाल्या तेंव्हा असणारी गट संख्या पुढच्या काही काळात रोडावत गेली. बरेच सदस्य येइनासे झाले.

एकीकडे आशादायी तर एकीकडे अस्वस्थ करणारा असा तो कालखंड होता. काही साथीदार दूर गेले. त्यातले काही पुढे परत जोडलेही गेले. पण सगळेच परत आले असे नाही.

Structure नसल्याचा इथेही एक उपयोग झाला. काही सदस्य वैतागून येइनासे झाले, काहीनी तसे परखड शब्दात व्यक्तही केले. पण त्यांच्या ह्या रोषाचा रोख कोण्या एक व्यक्तीकडे नव्हता. साधारण संस्थेमध्ये संचालक/ व्यवस्थापक ह्यांच्यावर रोष असतो, कर्मचारी सोडून जातात, तेंव्हा त्यांच्या असंतोषासाठी व्यवस्थापनाला जबाबदार धरले जाते, आरोप-प्रत्यारोप होतात. इथे तसे व्हायला वावच नव्हता. सगळेच सदस्य होते, सगळेच व्यवस्थापकही होते. त्यामुळे सदस्य सोडून गेले, त्याचे बोट कोणा ठराविक लोकांकडे दाखवले जात नव्हते. आपोआपच, यश मिळाले तर सगळ्यांचे; अपयश आले तरी सगळ्यांचे ही भावना दृढ होत गेली.

A close up of a lamp Description automatically generated

संख्याशास्त्रात normal distribution/ bell curve आपण शिकलो होतो ना, तसेच कुठल्याही गटाचे असते. सुरुवातीला उत्साह असतो, सदस्य संख्या भराभर वाढत जाते, उच्चांक गाठते, आणि नंतर कमी होऊ लागते. कधीकधी कमी होत जाऊन, सुरुवात केली तेंव्हा होती त्यापेक्षाही कमी होते. हा कालखंड सगळ्यात घाबरवून टाकणारा असतो. बरेच उपक्रम बंद पडतात ते ह्या इथेच. वाटचाल करत राहणे हेच गरजेचे आहे. वूडी अ‍ॅलनच्या शब्दात सांगायचे तर, ”80% of success is just showing up”. फेसबूकच्या भाषेत सांगायचे तर, 100 लाईक्स मिळत असताना काय कोणीही पोस्ट लिहिल, खरी परीक्षा आहे, जेंव्हा कोणी लाईक करत नाही, विशेष वाचत नाही, असे असतानाही नियमित लिहित रहाणे. असेच following तयार होते. ही एक प्रक्रिया आहे. यश मिळायला वेळ लागतो.

जे वाटचाल सुरु ठेवतात, त्यांचा नियमितपणा पाहून, परत सदस्य वाढतात. ह्याचा प्रत्यय पुढच्या अनेक उपक्रमान्मध्येही येत गेला. उपक्रम सुरु ठेवणे केवळ अशक्य आहे अशी स्थिती येते, आणि त्यावेळीही जे सदस्य वाटचाल सुरु ठेवतात, ते core team ठरतात.

जीवितनदीचेही असेच झाले. जे राहिले ते core team झाले. जीवितनदीच्या प्रसववेदना एकत्र सहन केलेले असल्याने, खूप घट्ट नाते ह्या सदस्यान्मंध्ये तयार झाले. विविध वयोगटातील, विविध शैक्षणिक, भिन्न सामाजिक पार्श्वभूमीचे असूनही, ह्या बंधामुळे पुढच्या वाटचालीतही मतभेद झाले तरी फारसे तात्विक संघर्ष झाले नाहीत.

  • अदिती देवधर, संस्थापक संचालक जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाऊंडेशन 

2
Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
newest oldest most voted
Notify of
Yogini Dolke
Guest
Yogini Dolke

Fantastic. That’s how movements are born. Dedicated and commited people bind together for a common cause. Three cheers to all of you!