Punyache Pani #7

पुण्याच पाणी (#७)

फ्लश केल्यानंतर त्या मैलापाण्याच पुढे काय होत असेल हा विचार आपल्या मनात कधीच येत नाही. पण हेच फ्लश केलेले मैलापाणी पुढे निसर्गात आणि मानवी जीवनातही केव्हढा हाहाकार उडवते याची कल्पनाही आपल्याला नसते.

पुण्यामध्ये दररोज अंदाजे ८०-९० कोटी लिटर मैलापाणी तयार होते. त्यावर प्रक्रिया करून, शुद्ध करून हे पाणी शेती, बागा आणि उद्योग यांना पुरवून त्याचा पुनर्वापर करणे हे खर तर आवश्यक असते. त्यासाठी जेव्हढे मैलापाणी तयार होते त्यापेक्षा थोड्या अधिक क्षमतेची प्रक्रिया यंत्रणा आवश्यक आहे. परंतु आज पुण्यात फक्त ५०-५५ कोटी लिटर मैलापाण्यावर प्रक्रिया होऊ शकेल एव्हढीच केंद्रे आहेत. म्हणजेच रोज जवळजवळ ४० कोटी लिटर मैलापाणी काहीही प्रक्रिया न करता तसेच नदीत सोडले जाते.

४० कोटी लिटर म्हणजे नक्की किती? मुठा नदीची शहर भागातील सरासरी खोली आणि पात्राची रुंदी लक्षात घेतली तर ५-६ किलोमीटर नदी फक्त मैलापाण्याने भरून जाईल! कधीकाळी जीवनदायिनी माता असलेल्या मुठा नदीची आज आपण मैला वाहून नेणारी मोलकरीण केली आहे. पण याबद्दल किती पुणेकरांना खरोखरीच खेद वा खंत वाटते? संशोधनाचा विषय आहे. असो!

आवश्यक क्षमता आणि प्रत्यक्ष उभी असलेली प्रक्रिया यंत्रणा यांच्यातील दरी हे गेल्या अनेक वर्षांचे दुखणे आहे. कारण नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हि एक अत्यावश्यक मुलभूत सुविधा आहे यावर बहुधा आपल्या शहरातील धोरणकर्त्यांचा विश्वासच नाही असं वाटावं अशी परिस्थिती आहे. बर, जी काही प्रक्रिया केंद्रे आहेत त्यांच्या कामगिरीवरही अनेकदा प्रश्नचिन्ह उभी राहिलेली आहेत. त्यातील इलेक्ट्रिकल backup सारख्या मुलभूत सोयीसुविधांचा अभाव, यंत्रणा व्यवस्थित चालावी म्हणून सुटे भाग आणि consumables यांचे गलथान व्यवस्थापन त्याबरोबरच कायद्याचा धाक नसलेली अत्यंत casual मानसिकता यामुळे बरेचदा आहे त्या प्रक्रिया केंद्रांची स्थिती दयनीय झालेली दिसते. आणि यामुळे प्रक्रियेविना सोडल्या जाणाऱ्या मैलापाणी समस्येत भरच पडते.

एखाद्या कारखान्यातून जर प्रदूषित पाणी नदीत सोडले जात असेल तर त्याला टाळे लावण्याचा अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळाला असतो आणि असे केल्याच्या बातम्याही अधून मधून येतात. एव्हढे प्रचंड प्रदूषण रोज आणि तेही अनेक वर्षे करणाऱ्या शहराला काय कायदा लावायचा? आणि काय शिक्षा करायची?

एव्हढ्या प्रचंड प्रमाणात प्रक्रियेविना सोडल्या जाणाऱ्या मैलापाण्यामुळे नक्की काय प्रश्न निर्माण होतात याची चर्चा आपण अजून चालूही केलेली नाही. हि फक्त या समस्येची पार्श्वभूमी आहे. याबद्दल अधिक पुढील भागात. पण वरील परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटत ते कळवत रहा .

-मनीष घोरपडे (एक नदीप्रेमी पुणेकर)

Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
Notify of